गलवान संघर्षात फक्त 5 सैनिक मारले; चीनने पहिल्यांदाच सांगितली आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

चीन भलेही आता फक्त 5 सैनिक मारले गेल्याचा दावा करत असला तरीही अमेरिकन आणि भारताच्याही गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कमीतकमी 40 चीनी सैनिक या चकमकीत मारले गेले होते.

पेइचिंग : पुर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात 15 जून रोजी झालेल्या हिंसेत किती चीनी सैनिक मारले गेले होते याचं रहस्य आता उलगडत आहे. द हिंदू या वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार चीनने भारतासोबत झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच असं सांगितलं आहे की गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात त्यांचे 5 सैनिक मारले गेले आहेत. यामध्ये चीनी सैन्यातील एक कमांडिंग ऑफिसर देखील समाविष्ट आहे. याआधी चीनने केवळ एक सैनिक मारला गेल्याचं सांगितलं होतं. मात्र या चकमकीत भारताचे 20 सैनिक शहिद झाले होते. 

हेही वाचा - 'आम्ही मदत केली तर...', भारत चीन वादात ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी

चीन भलेही आता फक्त 5 सैनिक मारले गेल्याचा दावा करत असला तरीही अमेरिकन आणि भारताच्याही गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कमीतकमी 40 चीनी सैनिक या चकमकीत मारले गेले होते. भारत आणि चीन दरम्यान होत असलेल्या चर्चेदरम्यान ही गोष्ट समोर आली आहे की, पुर्वोत्तर सीमाभागात भारत आणि चीनच्या वादग्रस्त भागात आठवड्याच्या रोटेशनच्या आधारवर गस्त घातली जाते. पूर्व लडाखमध्येही हीच पद्धत अवलंबली जाऊ शकते. सध्या पूर्व लडाखमध्ये देपसांग, पँगॉग सरोवराचा उत्तर आणि दक्षिण किनारा, पेट्रोलिंग पॉइंट 17 A, रेजांग ला आणि रेचिन ला या साऱ्या परिसरात दोन्ही सैन्य हे आमनेसामने आहे. 

हेही वाचा - अमेरिकी भारतीयांची ट्रम्प यांना पसंती; मोदी यांच्या मैत्रीसह अनेक मुद्यांवरून समर्थन

गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताने आपल्या मृत सैनिकांची संख्या सांगितली होती, मात्र चीनने यावर मूग गिळून गप्प बसण्याचीच भुमिका स्वीकारली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार त्यावेळीच चीन आणि अमेरिकेदरम्यान एक महत्वपूर्ण बैठक होणार होती. या  पार्श्वभूमीवरच चीनने या घटनेला कमी महत्वपूर्ण दाखवण्याच्या  प्रयत्नातच मृत सैनिकांचे आकडे कमी सांगितले असावेत. आणि म्हणूनच या  संपूर्ण प्रकरणी गप्प बसण्याची भूमिका घेतली असावी.  चीनी सैन्याचे प्रवक्ता झांग शुईली यांनी म्हटलं की या चकमकीत दोन्हीही बाजूचे सैन्य मारले गेले आहे. मात्र त्यांनी आपल्या सैनिकांची संख्या सांगितली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: galwan valley clash china told first time how many chinese soldiers killed