'आम्ही मदत केली तर...', भारत चीन वादात ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

आता या सीमावादाच्या एकूण तणावावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 

वॉशिंग्टन : चीन आणि भारत या दोन्ही शेजारी देशांदरम्यान गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. सीमेवरील हा तणाव असाच कायम असून दोन्ही देश खबरदारी म्हणून सतर्क असलेले दिसून येत आहेत. गलवान खोऱ्यात या दोन्ही देशांतील जवानांमध्ये चकमकही झाली होती. या चकमकीनंतर या देशांतील संबधांवर  अधिकच विपरित परिणाम झाला आहे. या प्रकरणी भारताने संयमाची आणि चर्चेची भुमिका घेतली आहे तर चीनच्या कुरघोड्या या सुरुच आहेत. मात्र आता या सीमावादाच्या एकूण तणावावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 

हेही वाचा - अमेरिकी भारतीयांची ट्रम्प यांना पसंती; मोदी यांच्या मैत्रीसह अनेक मुद्यांवरून समर्थन
भारत आणि चीन हे आशियातील दोन्ही बलाढ्य शेजारी राष्ट्रे आहेत. या दोन्ही देशातील वाढता तणाव चिंताजनक आहे. अशातच या वाढत्या तणावावर तोडगा काढण्यासाठी आम्ही मदत करु शकतो, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी केलेल्या संवादात त्यांनी या गोष्टीचा पुनर्रुच्चार केला. ते म्हणाले की, भारत आणि चीन या दोन्ही देशात वाद सुरु आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. हे प्रकरण संवादाने मध्यस्थी करुन मिटवण्यात आम्ही मदत करु शकलो तर आम्हाला ते आवडेल.

हेही वाचा - एकेरी डोसच्या लशीची 60 हजार जणांवर चाचणी

लडाख भागात सुरु असलेला सीमावाद सोडवण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवरच समोर आलेलं डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य महत्वपूर्ण मानलं जात आहे. अमेरिकेचे  परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनीदेखील चीनसोबत निष्पक्ष आणि संतुलित असे संबध प्रस्थापित करावयाचे आहेत, असं म्हटलेलं आहे. मात्र याआधी 2018 मध्ये ट्रम्प यांनी चीनसोबत व्यापार युद्ध सुरु केलं होतं. यामुळे दोन्ही देशातील संबध हे अधिक ताणले गेले होते. सध्या सुरु असणाऱ्या कोरोना महामारीच्या हाहाकाराला चीनच जबाबदार असल्यांचा आरोप अमेरिकेने केला होता. मात्र, चीनने या आरोपांना केराची टोपली दाखवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china border would love to help donald trump said white house america