गोळ्या झाडायला कमी पडणार नाही; उच्च स्तरीय बैठकीत भारताने चीनला ठणकावले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आमचे जवान गोळ्या झाडायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन्ही देशांत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यात गेल्या काही दिवसांपूर्वी दोन्ही देशात झालेल्या चकमकीनंतर तणावाचे वातावरण अधिकच वाढले होते. या पार्श्वभूमीवरच दोन्ही देशाचे  सैनिक सीमेवर सतर्क आहेत. तर हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सध्या होत आहेत. काल झालेल्या बैठकीत भारताने चीनला ठणकावले आहे. भारताच्या रक्षणासाठी आमचे सैन्य कोणत्याही थराला जाऊ शकते. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आमचे जवान गोळ्या झाडायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत. थोडक्यात, भारताने चीनला हा स्पष्ट संदेश दिला आहे की, जर आम्हाला भाग पाडलंत तर आम्ही संघर्षाचा पवित्रा घ्यायला मागे हटणार नाही. 

हेही वाचा - एकेरी डोसच्या लशीची 60 हजार जणांवर चाचणी

एका अधिकाऱ्याने आपलं नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, चीनला स्पष्टपणे सुनावलं गेलं आहे की, धक्का-बुक्की आता अजिबात सहन केली जाणार नाही. जर चीनने आपली मर्यादा ओलांडली तर भारतीय सैन्यदेखील गोळीबार करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. 

दोन्ही देशांनी आपापले अतिरिक्त सैन्य लडाख परिसरात तैनात केले आहे. यामुळे तणावाची परिस्थिती ही गेल्या काही महिन्यापासून जैसे-थे आहे. मात्र, कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या सैन्य स्तरावरील संवादाच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. तणाव कमी करण्यासाठी अजून कोणताही उत्तम मार्ग निघालेला नाही. कडक थंडीच्या त्रासदायक महिन्यांमध्येही दोन्ही देशांचे सैन्य आजही आपापल्या निश्चयावर ठाम आहेत. 

हेही वाचा - 'आम्ही मदत केली तर...', भारत चीन वादात ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी

दहा दिवसांनंतर पुन्हा एकदा चर्चेसाठी बैठक होणार असल्याचे समजत आहे. लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह आणि चीनचे सैन्य अधिकारी लियु लिन की यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधींच्या दरम्यान ही बातचीत होणार आहे. दरम्यान भारताने आपली भुमिका स्पष्ट करत सहाव्या बैठकीत चीनला जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा दाखवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india clearly says to china indian soldiers will open fires in extreme circumstances