भारतात तयार होणार रशियाच्या लशीचे 10 कोटी डोस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

स्पुटनिक ५ ही लस निर्माण केलेल्या आणि जगात सर्वप्रथम नोंदणी केलेल्या रशियाच्या गामालेया संशोधन संस्थेने एस्ट्राझेनेकाला युतीचे आमंत्रण दिले. 

नवी दिल्ली -  भारतासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यावर उपचार नसल्यानं लोकांच्या सर्व आशा आता व्हॅक्सिनवर आहेत. यातच रशियाची व्हॅक्सिन स्पुतनिक V बाबत मोठी माहिती समोर येत आहे. रशियाच्या या व्हॅक्सिनचे 10 कोटी डोस भारतात तयार होणार आहेत. 

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि हैदराबादची हेटेरो बायोफार्मा कंपनीमध्ये करार झाला आहे. यामध्ये स्पुतनिक व्ही लशीचे वर्षाला 10 कोटी डोस तयार करण्यावर एकमेकांच्या संमतीने ठरले आहे. याबाबत रॉयटरने वृत्त दिले असून त्यात रशियाच्या कोविड - 19 व्हॅक्सिन स्पुतनिक व्हीच्या ट्विटर अकाउंटवरून अशी माहिती देण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

रशियाने नुकताच असा दावा केला होता की, कोरोना व्हायरस व्हॅक्सिन स्पुतनिक व्ही दुसऱ्या डेटा विश्लेषणानुसार 95 टक्के प्रभावी ठरली आहे. व्हॅक्सिन डेव्हलपर्सने ही माहिती दिली होती. रशियाचे आरोग्य मंत्रालय, गामलेया संशोधन केंद्र आणि आरडीआयएफने म्हटलं होतं की, 42 दिवसानंतर मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर हे निष्कर्ष काढण्यात आले होते. याआधी फायजर आणि मॉडर्नाच्या व्हॅक्सिन 90 टक्क्यांहून जास्त प्रभावी ठरल्याचं समोर आलं होतं. 

हे वाचा - देशाला कोरोनाचा दणका तरीही राष्ट्राध्यक्ष म्हणतात लस टोचून घेणार नाही

रशियाची व्हॅक्सिन स्पुतनिक व्हीच्या एका डोसची किंमत 10 डॉलर म्हणजेच जवळपास 750 रुपये इतकी असेल. रशियन नागरिकांसाठी लसीकरण मोफत असणार आहे. तर ज्यांनी रशियाच्या या व्हॅक्सिनसाठी अर्ज केला आहे त्यांना पहिली बॅच मार्च 2021 पर्यंत मिळेल. सध्या आरडीआयएफला इतर देश आणि कंपन्यांकडून अर्ज मिळत आहेत आणि त्यामुळेच कंपनीकडून निर्मिती वाढवण्यावर भर दिला जात आहे.

स्पुटनिक ५ ही लस निर्माण केलेल्या आणि जगात सर्वप्रथम नोंदणी केलेल्या रशियाच्या गामालेया संशोधन संस्थेने अॅस्ट्राझेनेकाला युतीचे आमंत्रण दिले. तुमची लस परिणामकारक ठरावी म्हणून तुमच्या डोसच्या जोडीला आमचाही डोस द्यावा, असे ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आले.

हे वाचा - कोरोना काळातही US मधील श्रीमंतांच्या संपत्तीत 7,44,20,48,88,00,000 रुपयांची वाढ

अॅस्ट्राझेनेकाची सध्याची दोन पूर्ण डोसची पद्धत ६२ टक्के परिणामकारकता दर्शविते. त्यांनी प्रयोगशाळेत नव्या चाचण्या घ्यायचे ठरविले तर त्यांच्या डोसच्या जोडीला आमचा डोस द्या. दोन लशी एकत्र करणे फेरलसीकरणासाठी महत्त्वाचे ठरू शकेल, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. आपल्या लशीची परिणामकारकता ९० टक्के असल्याचे गामालेयाने जाहीर केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india will produce 100 million doses of russia s sputnik v vaccine