'आयटी'मध्ये भारतीयांचे 'जय हो'; अरविंद कृष्णा झाले 'आयबीएम'चे सीईओ!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

1990 साली आयबीएममध्ये आपल्या करिअरला सुरुवात केलेल्या कृष्णा यांनी कंपनीत विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषविली आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध अमेरिकी कंपनी 'इंटरनॅशनल बिजनेस मशीन कॉर्पोरेशन' (आयबीएम) सीईओपदी भारतीय वंशाच्या अरविंद कृष्णा यांची निवड करण्यात आली आहे. 57 वर्षीय कृष्णा सध्याचे सीईओ गिनी रोमेट्टी यांच्याकडून 6 एप्रिल रोजी सीईओ पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला , गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यानंतर अरविंद कृष्णा यांच्या रूपाने आणखी एका भारतीयाच्या हाती जगप्रसिद्ध आयटी कंपनीची सूत्रे आली आहेत. मॅनफ्रेम कंप्यूटिंग ते क्लाऊड कम्प्युटिंग आणि ब्लॉकचेन सारख्या आधुनिक तंत्रज्ञान विकासासाठी आयबीएम ओळखली जाते.  

- विप्रोच्या 'सीईओ'पदावरून अबिदाली नीमुचवाला होणार पायउतार

कृष्णा यांची निवड जाहीर करताना 'अत्यंत बुद्धिमान तंत्रज्ञानी' आणि 'आयबीएमच्या पुढच्या कालखंडासाठी अतिशय योग्य सीईओ' अशा शब्दात गिनी रोमेट्टी यांनी कृष्णा यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. आयबीएमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स / कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड, क्वांटम कम्प्युटिंग आणि ब्लॉकचेन यासारख्या महत्वाच्या तंत्रज्ञान विकासात कृष्णा यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगत त्यांच्याकडे 'आजला जिंकणाऱ्या आणि भविष्यातील मजबूत व्यवसायाची पायाभरणी करणारे नैतृत्वगुण असल्याचे स्तुतिशब्द रोमेट्टी यांनी काढले आहेत. 2012 सालापासून गिनी रोमेट्टी या आयबीएमच्या प्रेसिडेंट आणि सीईओपदी कार्यरत होत्या.

- INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी

कोण आहेत अरविंद कृष्णा?

अरविंद कृष्णा हे आयआयटी-कानपूरचे पदवीधर आहेत. त्यांनी अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी केली आहे.  आहे. त्यांच्या नावावर १५ पेटंट्स जमा आलेत. आयईईई आणि एसीएम जर्नल्सचे संपादक आहेत.

क्लाउड कंप्युटिंग टेक्नोलॉजी क्षेत्रातील आघाडीच्या रेड हॅट कंपनीचे आयबीएममध्ये अधिग्रहण करण्यात कृष्णा हेच मुख्य व्यक्ती होते. 34 अब्ज डॉलरमध्ये रेड हॅटला विकत घेण्यात आले. आयबीएमच्या 108 वर्षांच्या इतिहासात तसेच जगाच्या आयटी क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार मानला जातो.  रेड हॅटच्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम या ओपन सोर्स सॉफ्टवेअरमुळे आयबीएमची क्लाउड कंप्युटिंगच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे.

- घरांच्या किमती चढ्याच राहणार; वाचा आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतो!

1990 साली आयबीएममध्ये आपल्या करिअरला सुरुवात केलेल्या कृष्णा यांनी कंपनीत विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषविली आहेत.

कृष्णा यांची आयबीएमच्या प्रमुखपदी नेमणूक होण्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या (मल्टिनॅशनल) प्रमुखपदी भारतीयांची निवड होणारी यादी वाढतच चालली आहे. या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा, पेप्सीकोचे माजी सीईओ इंद्र नुयी आणि अ‍ॅडोबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian origin Arvind Krishna elected new CEO of IBM