बायडेन यांचा शपथविधी ठरला ऐतिहासिक; वाचा सोहळ्याची खास वैशिष्ट्ये

टीम ई सकाळ
Wednesday, 20 January 2021

अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस यांनीही उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस यांनीही उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत.

दरम्यान, अमेरिकेची यावेळची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहीली. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आरोप, निकालाविरोधात न्यायालयात घेतलेली धाव आणि मतमोजणीवेळी संसदेवर त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ला यांसारख्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात तब्बल दीडशे वर्षानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष शपथविधी सोहळ्यासाठी अनुपस्थित राहिले. 

हे वाचा - अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाचा इतिहास; कुणी किती शब्दांत आणि मिनिटांत भाषण आटोपलं?

ट्रम्प शपथविधीला नसणारे चौथे अध्यक्ष
अमेरिकेच्या लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत तीन अध्यक्षांनी उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधी सोहळ्यात सहभाग घेतलेला नाही. शपथविधीला न जाणारे ट्रम्प हे चौथे मावळते अध्यक्ष होत. यापूर्वी १८०१ मध्ये जॉन एडम्स, १८२९ मध्ये त्यांचा मुलगा जॉन क्विंन्सी एडम्स आणि १८६९ मध्ये ॲड्र्यू जॉन्सन सहभागी झाले नव्हते.

शपथविधी सोहळ्याची वैशिष्ट्ये
- गेल्या तीन दशकांत प्रथमच सकाळच्या वेळेत शपथविधी
- १२७ वर्ष जुन्या बायबलवर हात ठेवून बायडेन यांनी घेतली शपथ

हे वाचा - ट्रम्प यांनी जाता जाता दिले धक्के; गडबडीत उरकली कामे

ज्यो बायडेन यांची वाटचाल
शंभर दिवसाचा प्रमुख अजेंडा तयार केला
जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका राहणार
पॅरिस करारात पुन्हा वापसीची शक्यता

या आश्‍वासनांवर अंमल करणार
- लस : पहिल्या शंभर दिवसांत १० कोटी जणांना कोरोना प्रतिबंधक लस
- स्थलांतर : नोंदणी नसलेल्या १.१ कोटी जणांना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव मांडणार
- न्यायव्यवस्था: सर्व विचारसरणीशी निगडित लोकांची समिती नेमणार. सहा महिन्यात अहवाल देणार

ट्रम्प यांचं फेअरवेल स्पीच; अखेरच्या भाषणात 'US कॅपिटॉल' हिंसेचा निषेध, पुढील प्रशासनाला सदिच्छा

लेडी गागाचे राष्ट्रगीत अन कॅपिटॉलची सुरक्षा
अमेरिकेच्या नव्या अध्यक्षपदाचा शपथविधी सोहळा यंदा वेगळा ठरला. कोरोना संसर्गाचे सावट असल्याने अध्यक्षपदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. यंदा अनेक कलांकारांनी डिजिटल माध्यमांतून कार्यक्रमात सहभाग घेतल्याने त्यास ‘सेलिब्रेटिंग अमेरिका’ असे नाव देण्यात आले होते. यंदा कोरोना संसर्गामुळे छोटेखानी स्वरुपात शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध अभिनेते टॉम हँक्स यांनी केले. प्रसिद्ध गायिका लेडी गागा यांनी कॅपिटॉलच्या पश्‍चिम भागात साकारलेल्या व्यासपीठावरून अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले. यात अभिनेत्री आणि गयिका जेनिफर लोपेझ यांनी साथ दिली.

हे वाचा - अमेरिकेला समृद्ध ठेवण्यासाठी काम करावं; बायडेन यांना ट्रम्पनी दिल्या शुभेच्छा

सोहळ्याचे जगभरात प्रसारण
शपथविधीचे जगभरात प्रसारण करण्यात आले. एबीसी, सीबीएस, सीएनएन, एनबीसी, एमएसएनबीसी आणि पीबीएस नेटवर्कवर प्रसारण झाले. त्याचबरोबर सोशल मीडिया आणि इंटरनेटवरही त्याचे प्रसारण करण्यात आले. अर्थात फॉक्स न्यूजवरून या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले नाही.

अशी होती व्यवस्था
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची संख्या हजार ठेवण्यात आली होती. एरव्ही दोन लाखांपर्यंत नागरिक उपस्थित राहतात. प्रत्येकांना मास्क घालणे बंधनकारक केले होते तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. कॅपिटॉल येथे ट्रम्प समर्थकांनी केलेला हिंसाचार पाहता संपूर्ण वॉशिंग्टन शहराभोवती सुरक्षा रक्षकांचे कडे करण्यात आले होते. हिंसेची शक्यता लक्षात घेऊन कॅपिटॉल भोवती अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. सुमारे २५ हजार अतिरिक्त जवानांची नियुक्ती केली होती. तसेच तारेचे कुंपणही कॅपिटॉल आणि व्हाइट हाऊस परिसरात उभारण्यात आले. अनेक रस्ते सुरक्षेच्या कारणाने बंद ठेवण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: joe biden oath ceremony historical trump not present