कोरोनामुळे कराची विमान दुर्घटना, प्राथमिक अहवालातून समोर आली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

विमान तांत्रिकदृष्ट्या उड्डाणासाठी शंभर टक्के तंदुरुस्त होते. त्यात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इस्लामाबाद, ता. 24 ः पाकिस्तानमधील विमान अपघाताचे महत्त्वाचे कारण प्राथमिक अहवालानुसार उघड झाले असून लॅंडिंगच्यावेळी वैमानिक कोरोना साथीबद्दल चर्चा करीत होते आणि त्यामुळे त्यांचे चित्त विचलीत झाले होते.  "पीआयए'चे (पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स) विमान 22 मे रोजी कराची विमानतळाजवळील नागरी वस्तीत कोसळून त्यातील 97 प्रवासी ठार झाले. केवळ दोन जण बचावले होते. दोन्ही इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे अपघात घडला. यास मानवी चुक कारणीभूत असल्याचे वृत्त मंगळवारी आले होते. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार वैमानिकांमधील संभाषणाचा मुद्दा उघड झाला. 

पाकमध्ये शीख युवतीचे अपहरण करुन धर्मांतर अन्...

हवाई वाहतुक मंत्री गुलाम सरवार खान यांनी संसदेत याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "वैमानिक तसेच हवाई वाहतुक नियंत्रक यांनी प्रमाणित नियमांचा अवलंब केला नाही. वैमानिक कोरोना विषाणूच्या धोक्‍यांबद्दल चर्चा करीत होते. त्यांच्या कुटुंबावर संसर्गाचा परिणाम झाला होता आणि ते पूर्ण वेळ याचीच चर्चा करीत होते. त्यांच्या डोक्‍यात केवळ विषाणूचेच विचार होते. त्यातच "एअरबस ए320'च्या "लॅंडिंग'चा प्रयत्न करताना "ऑटोपायलट' यंत्रणा बंद केली होती. दुर्दैवाने वैमानिकाने फाजील आत्मविश्‍वास दाखविला. विमान तांत्रिकदृष्ट्या उड्डाणासाठी शंभर टक्के तंदुरुस्त होते. त्यात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता.' 

चीननंतर पाकला खुमखुमी; जवान हुतात्मा

"लॅंडिंग गिअर' खाली करण्यात आला नव्हता. त्यावेळी धावपट्टीपाशी येताना जी उंची राखावी लागते तिचे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त होते. नियमांचा अवलंब न झाल्यामुळे इंजिनाचे बरेच नुकसान झाले. "लॅंडिंग'चा दुसरा प्रयत्न करताना विमान कोसळले. 

पाक पोलिसांनी घाणेरडे पाणी पाजले; रॉडने मारले...

चौकशी पथकात फ्रेंच सरकारच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी कॉकपीट डाटा आणि व्हॉइस रेकॉर्डरची छाननी केली. याबाबतचा संपूर्ण अहवाल वर्षाअखेर जाहीर केला जाईल. सध्या कोसळलेल्या विमानाच्या भागांची अद्ययावत छाननी सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karachi plane crash report says main reason behind accident is discussion on coronavirus