esakal | कुलभूषण जाधव यांच्याकडे 4 दिवस बाकी; पाकच्या खेळीला भारत शह देणार?
sakal

बोलून बातमी शोधा

kulbhushan jadhav

पाकिस्तानात मृत्यूदंडाच्या शिक्षेविरुद्ध रिव्ह्यू पेटिशन दाखल करण्यासाठी कुलभूषण जाधव यांना 20 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

कुलभूषण जाधव यांच्याकडे 4 दिवस बाकी; पाकच्या खेळीला भारत शह देणार?

sakal_logo
By
सूरज यादव

कराची - हेरगिरीचा खोटा आरोप करत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी पाकिस्ताने आता नवी खेळी केली आहे. रिव्ह्यू पेटिशन दाखल करता येऊ नये यासाठी पाककडून कट कारस्थान रचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानने दबाव टाकून कुलभूषण जाधव यांच्याकडून हवा तसा जबाब नोंदवून घेतला होता. त्यानंतर फेअर ट्रायलशिवाय मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव या निर्णयाविरुद्ध अपील करणार नाहीत. त्यामुळे जाधव यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या भारतासमोरच्या अडचणी वाढू शकतात. याआधी पाकिस्तानला या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दणका दिला होता. पाकिस्तानने फाशीच्या निर्णयाला स्थगिती देऊन पुनर्विचार करावा असे आदेशही दिले होते. 

पाकिस्तानात मृत्यूदंडाच्या शिक्षेविरुद्ध रिव्ह्यू पेटिशन दाखल करण्यासाठी कुलभूषण जाधव यांना 20 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. मात्र पाकिस्तानचा दावा आहे की, जाधव पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी तयार नाहीत. ते दया याचिका दाखल करू इच्छितात असंही पाकने म्हटलं आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत जाधव यांना कोणत्याही अटीशिवाय राजनैतिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. यातही पाकिस्तानने खोडा टाकताना काही अटी घालून कॉन्स्युलर अॅक्सेस दिला होता. भारताला अशा प्रकारची मदत नको आहे. 

हे वाचा - जगभरातील दिग्गजांची ट्विटर अकाउंट हॅक; कोण कोण आहे यादीत?

पाकिस्तानने कॉन्स्युलर अॅक्सेस देताना घातलेल्या अटींबाबत भारताने म्हटलं की, पाक या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायलयानं दिलेल्या निर्णयाचे खरंच पालन करू इच्छित असेल तर कोणत्याही अटींशिवाय जाधव यांना राजनैतिक मदत मिळवून द्यावी. कोणत्याही अडथळ्यांशिवाय जाधव यांना राजनैतिक अधिकाऱ्यांशी बोलण्यास द्यावं. ते मोकळेपणानं बोलू शकतील. यावेळी पाकिस्तानचा अधिकारी त्याठिकाणी असू नये. तसंच कोणत्याही प्रकारचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही होऊ नये. ज्यामुळे न घाबरता जाधव त्यांचे म्हणणे मांडू शकतील. 

जाधव यांना रिव्ह्यू पेटिशन दाखल करता येऊ नये यासाठी पाकिस्तानने 20 मे रोजी अध्यादेश जारी करून असं म्हटलं की, या प्रकरणी 60 दिवसांनंतर कोणतीही रिव्ह्यू पेटिशन दाखल करता येणार नाही. त्यानुसार 20 जुलै हा रिव्ह्यू पेटिशन दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असेल असंही सांगण्यात आलं. पाकिस्तानचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध असल्याचं भारताने म्हटलं होतं. 

हे वाचा - चिनी कंपन्यांचे वागणे ईस्ट इंडिया कंपनीसारखे; अमेरिकेचा पुन्हा हल्लाबोल

रिव्ह्यू पेटिशनसाठी फक्त चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे भारतासमोर अडचणी वाढल्या आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय रिव्ह्यू पेटिशनसाठी गेल्यास पाकिस्तानला आयती संधी मिळेल. यासाठीच भारत आता दबावतंत्राचा वापर करत आहे. ज्यामुळे राजनैतिक अधिकाऱ्यांना जाधव यांच्याशी भेटण्याची परवानगी मिळेल. रिव्ह्यू पेटिशनचा शेवटचा दिवस जवळ असल्यानं भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायलयात जाण्याचा विचार करत आहे.