वंदे भारत मिशनमध्येही महाराष्ट्राशी दुजाभाव, दुबईतील मराठी उद्योजक आला पुढे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

दुबईहून महाराष्ट्रात परतण्यासाठी वंदे भारत मिशनअंतर्गत तीन टप्प्यात एकही फ्लाइट नाही. त्यामुळे या लोकांच्या मदतीला दुबईत असलेले उद्योजक राहुल तुळपुळे धावून आले आहेत.

दुबई - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून यामुळे परदेशात अनेक भारतीय अडकून पडले आहेत. दुबईला नोकरीनिमित्त गेलेले महाराष्ट्रातील काही लोकही अडकले आहेत. जवळपास दहा हजार जणांनी मुंबई आणि पुण्याला परत येण्यासाठी भारतीय दुतावासात रजिस्ट्रेशन केलं आहे. मात्र दुबईहून महाराष्ट्रात परतण्यासाठी वंदे भारत मिशनअंतर्गत तीन टप्प्यात एकही फ्लाइट नाही. त्यामुळे या लोकांच्या मदतीला दुबईत असलेले उद्योजक राहुल तुळपुळे धावून आले आहेत. त्यांनी जवळपास 400 लोकांना भारतात पाठवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये गर्भवती महिला, जेष्ठ नागरिक ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत. तसंच कुटुंबात कोणाला वैद्यकीय मदतीची गरज आहे अशा लोकांचा समावेश आहे.

हे वाचा - दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडुत लॉकडाऊन वाढणार? राज्य सरकारकने दिली माहिती

मुंबई मिररशी बोलताना राहुल तुळपुळे म्हणाले की, दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांच्या समस्यांबाबत धनश्री पाटील यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. तो पाहिल्यानंतर लोकांना मदत कऱण्याचा निर्णय घेतला. यासाठी महाराष्ट्र सरकार, दुबईतील भारतीय दुतावास यांच्याशी आठवडाभर पत्रव्यवहार केल्यानंतर हे सर्व शक्य झालं. भारतात परतण्यासाठी प्रवाशांनीच विमानाचे पैसे भरले आहेत. तसंच ज्यांच्या नोकऱ्या गेल्या असून पैसे भरणे शक्य नाही त्यांच्यासाठी GMBF ने मदतीचा हात पुढे केला असंही तुळपुळे यांनी म्हटलं. 

हे वाचा : राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यास काय करणार? ट्रम्पनी दिलं उत्तर

वंदे भारत फ्लाइट अबु धाबी ते मुंबईसाठी 11 जून आणि 19 जूनला फ्लाइट शेड्युल आहेत. तर फ्लायदुबईच्या दुबई ते मुंबईसाठी 13 जुनला तर दुबई ते पुण्यासाठी 14 जुनला फ्लाइटचे उड्डाण होईल. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाली असल्याचंही तुळपुळे यांनी सांगितले. 

हे वाचा : अमेरिकेत कोरोनाबाबत व्हाईट हाऊसचा नवा दावा

तुळपुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला येण्यासाठी 8500 लोकांनी तर पुण्याला येण्यासाठी 1600 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं.  यातील काहींनी भीतीमुळे रजिस्ट्रेशन केलं होतं. प्रत्यक्षात 6 ते 7 हजार लोक असे आहेत ज्यांना भारतात परतणे आवश्यक आहे. त्यासाठी 20 ते 30 फ्लाइट लागतील. 

हे वाचा - कोरोनाच्या संकटातही सुरक्षित 10 देशांची यादी जाहीर; जाणून घ्या भारत कितव्या स्थानी

राहुल तुळपुळे हे सातत्याने शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात होते. यामध्ये कोणतीही वैयक्तिक राजकीय भूमिका नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आदित्य ठाकरे यांनी दुबई, हाँग काँग, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कर्गिझस्तानसह इतर अनेक ठिकाणांहून येण्यासाठी वंदे भारतच्या तिसऱ्या टप्प्यात फ्लाइट नसल्याचं एअर इंडियाच्या निदर्शनास आणून दिलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra group in dubai help to peoples who stranded