
डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीतील निकाल अमान्य केले आहेत.
वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी मॅरी ट्रम्प ही तिच्या ट्रम्प काकांच्या जोरदार विरोधासाठी प्रसिद्ध आहे. आपले काका म्हणजे सायको व्यक्ती आहे, असं स्वत: सायकॉलॉजिस्ट असणारी मॅरी सांगते. तिने आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी पुन्हा टोकदार मते मांडली आहेत. तिने म्हटलंय की, तिच्या काकांनी 2020 ची राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल यासाठी अमान्य केलाय कारण त्यांना खरोखरच असं वाटतं की तेच जिंकले आहेत.
मॅरी ट्रम्पने पुढे म्हटलंय की, मला असं वाटत नाही की त्यांनी आपल्या पराभवाचे सत्य स्वीकारले आहे. तसेच मला वाटत नाही की ते पराभव स्विकारण्यासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम आहेत. मॅरी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या भावाची मुलगी आहे. फ्रेड ट्रम्प हे स्वत: डेमोक्रॅटीक पक्षाचे समर्थक आहे. तिने अलिकडेच आपले काका डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. 'टू मच एँड नेव्हर इनफ: हाऊ माय फॅमिली क्रिएटेड वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन' असं या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात तिने आपल्या काकांच्या वाढत्या वयातील किस्से आणि मते मांडली आहेत. एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून तिने त्यांच्या साऱ्या व्यक्तीमत्त्वाचे परिशीलन करुन मते मांडली आहेत.
हेही वाचा - भारतीय वंशाच्या गीतांजलीनं रचला इतिहास; 'किड ऑफ द ईअर'ची ठरली मानकरी
या पुस्तकातील एका किस्स्यानुसार, ट्रम्प यांचे वडिल फ्रेड ट्रम्प सिनियर यांची एक महत्त्वाची शिकवण आहे ती म्हणजे कधीच कमकुवतापणा दाखवू नका. त्यामुळे निवडणुकीतील परावभव स्विकारणे हे कमकुवतपणा दाखवल्याचे लक्षण ठरेल. तिने सांगितलं की तिला खात्री आहे की तिचे काका कधीही अध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारणार नाहीत. कारण यामुळे ते पराभूत ठरतील, जे स्विकारणे त्यांच्या मानसिकतेच्या बाहेर आहे. मॅरीने माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, डोनाल्ड ट्रम्प हे एक खोलवर नुकसान झालेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिकतेचा महत्त्वाचा एक भाग असा आहे की, त्यांना कमकुवत अथवा पराभूत म्हणून दाखवणारे सगळ्या प्रकारचे वास्तव ते झिडकारून टाकतात.
हेही वाचा - VIDEO : भारीच की! भाव्वा, हा तर 'Biker Doggie' व्हिडिओ पाहाल तर थक्क व्हाल!
डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीतील निकाल अमान्य केले होते. अजूनही त्यांनी आपला पराभव मान्य केला नाहीये. मतमोजणी सुरु असतानाच आपला पराभव होतोय, हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी ही फसवी निवडणूक असल्याचा आरोप करत सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी निकाल अमान्य केला आहे. तसेच मीच जिंकलो आहे, असा छातीठोक दावाही केला आहे. मात्र, अमेरिकेतील माध्यमांनी तसेच न्यायालयाने ट्रम्प यांचे हे आरोप अमान्य करत जो बायडन यांच्या नेतृत्वावर शिक्का मारला आहे. येत्या 20 जानेवारी रोजी जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील.