
पाकिस्तानमधील तब्बल 40 टक्के वैमानिक हे बनावट असल्याची धक्कादायक माहिती विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी संसदेत दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कराची: पाकिस्तानमधील तब्बल 40 टक्के वैमानिक हे बनावट असल्याची धक्कादायक माहिती विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी संसदेत दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या विमान अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे.
पाकच्या मंत्र्याने 'कोविड 19'चा लावला जावई शोध...
कराचीमध्ये 22 मे रोजी विमानला अपघात झाला होता. या अपघाताची चौकशी करताना ही माहिती समोर आली. विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी या अपघाताबाबतच्या तपासाचा अहवाल बुधवारी संसदेत सादर करण्यात केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'विमानात कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष नव्हता. या दुर्घटनेला वैमानिक, केबिन क्रू आणि एटीसी जबाबदार आहेत. विमानाला अपघात होण्यापूर्वी वैमानिक कोरोनाव्हायरसपासून कुटुंबास वाचविण्याविषयी बोलत असल्याचे रेकॉर्डिंग आहे. अपघातग्रस्त विमानातील वैमानिकला अति आत्मविश्वासात होता. त्यांनी विमानाकडे लक्ष दिले नाही. एटीसीने त्याला विमानाची उंची वाढवण्यास सांगितली होती. पण, आम्ही सर्व काही सांभाळू, असे उत्तर दिले.'
पाकिस्तानच्या धर्मगुरुचा कोरोनाबाबत अजब दावा...
सरकारी विमान कंपन्यांमध्ये तब्बल 40 टक्के वैमानिकांकडे बनावट परवाने असल्याचे सांगताना खान म्हणाले, सरकारी विमान कंपन्यांमध्ये 40 टक्के वैमानिक असे आहेत जे बनावट परवान्यासह विमानांचे उड्डाण करतात. या लोकांनी कधीही परीक्षा दिली नाही किंवा त्यांना उड्डाणांचा अनुभवही नाही. त्यांच्या भरतीत राजकीय हस्तक्षेप आहे. त्या वैमानिकांच्या पदव्या पण बनावट असल्याचे आढळून आले आहे. पण, या अपघातास जो जबाबदार असेल त्याला वाचवले जाणार नाही. वैमानिकांनी लँडिंग गिअर न उघडता तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला. यामुळे विमानाचे इंजिन खराब झाले. आणि नंतर विमान कोसळले. वैमानिक आणि एटीसी यांच्यात झालेल्या चर्चेची संपूर्ण नोंद आमच्याकडे आहे. मी ते स्वतः ऐकले आहे.'