नानकाना साहिब संपूर्णपणे सुरक्षित; पाकचा दावा

पीटीआय
Sunday, 5 January 2020

दोन मुस्लिम समुदायात एका घटनेवरून धुमश्‍चक्री उडाली आणि त्यात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीला अटक केली आहे.

इस्लामाबाद : पंजाब प्रांतातील गुरुद्वारा नानकाना साहिब संपूर्णपणे सुरक्षित असून, त्यास कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला. यादरम्यान भारतातून मात्र या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पक्षांनी गुरुद्वारावरील दगडफेकीचा निषेध करत संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुरू नानकदेव यांचे जन्मस्थान असलेल्या गुरुद्वारा नानकाना साहिबवर शुक्रवारी (ता.3) स्थानिक मुस्लिम समुदायाने दगडफेक केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आणि भारताने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला; तसेच गुरुद्वारा आणि शीख समुदायाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली; परंतु पाकिस्तानने दगडफेकीसंदर्भातील वृत्तांचा इन्कार केला आहे.

- गुरुद्वारा नानकाना साहिबवर जमावाची दगडफेक 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (ता.3) रात्री प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, दोन मुस्लिम समुदायात एका घटनेवरून धुमश्‍चक्री उडाली आणि त्यात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे गुरुद्वारा सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि विशेषत: अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत पाकिस्तान सरकार कटिबद्ध असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. 

- पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ

राहुल गांधींची टीका 

नानकाना साहिब गुरुद्वारावर काल जमावाने केलेली दगडफेक आणि घोषणाबाजीसंदर्भात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली. परस्पर सन्मान आणि प्रेम, सौहार्द या आधारावरच धर्मांधतेचे विष संपवता येते, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. नानकाना साहिब गुरुद्वारावरचा हल्ला निंदनीय आहे आणि त्याचा तीव्र निषेध करायला हवा, असे राहुल यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे.

कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मुझफ्फरनगर येथे पत्रकार परिषदेत अशा घटनांची निंदा व्हायला हवी, असे म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत नानकाना साहिब गुरुद्वारावरचा हल्ला हा मानवता, आदर्श व धार्मिक मूल्यांवर घाला असल्याचे म्हटले आहे. या घटनेला पाकिस्तान सरकार जबाबदार आहे. पाकिस्तानच्या सरकारने नानकाना साहिबच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. 

- 'भूज'चा फर्स्ट लुक आउट; अजय देवगण उडविणार पाकिस्तानची दाणादाण

हरसिमरत कौर बादल यांचीही टीका 

पाकिस्तानातील गुरुद्वारा नानकाना साहिबवर जमावाने केलेल्या हल्ल्याचा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी निषेध केला आहे. या घटनेच्या माध्यमातून पाकिस्तानचा खरा चेहरा उघडकीस आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर अल्पसंख्याकांच्या सुरक्षितेबाबतचा मुद्दा मांडावा, अशी मागणी बादल यांनी केली.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही गुरुद्वारावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्विटरवर म्हटले की, हा हल्ला निंदनीय असून पाकिस्तान सरकारने दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani government claims that Nankana Sahib is completely safe