PM Modi Egypt Visit : इजिप्त आता ‘धोरणात्मक भागीदार’; चार करारांवर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव
PM Modi Egypt Visit
PM Modi Egypt Visitsakal

कैरो : अमेरिकेचा दौरा आटोपून इजिप्तला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या देशाचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांची भेट घेतली. दोन देशांमधील संबंध ‘धोरणात्मक भागीदारी’ या पातळीवर नेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी दोघांनी धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय आणखी तीन करारांवरही सह्या करण्यात आल्या. यावेळी मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवही करण्यात आला.

पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर आले आहेत. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली यांच्याबरोबर गोलमेज बैठक घेतल्यानंतर मोदी यांनी विविध क्षेत्रांमधील लोकांची भेट घेत त्यांच्याबरोबर चर्चा केली.

यामध्ये उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, योगाभ्यास करणारे यांचा समावेश होता. त्यानंतर मोदी यांचे आज अध्यक्षीय प्रासादात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सिसी यांनी बंद दरवाजा आड चर्चा केली.

यामध्ये भारत आणि इजिप्तमधील संबंध ‘धोरणात्मक भागीदारी’ या पातळीवर नेण्याचा निर्णय होऊन तसा करार करण्यात आला. याशिवाय, कृषी आणि पूरक व्यवसाय, स्मारके आणि प्राचीन स्थळांचे संरक्षण तसेच, स्पर्धा कायदा या क्षेत्रासंबंधी करार करण्यात आले.

व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याबाबतही चर्चा झाली. इजिप्तला भेट देणारे मोदी हे मागील २६ वर्षांतील भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत.

मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला.

PM Modi Egypt Visit
PM Modi Egypt tour: PM मोदी थेट अमेरिकेतून इजिप्तमध्ये दाखल! दोन्ही देशांमधील 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा

इजिप्तसाठी किंवा मानवजातीसाठी अमूल्य काम करणाऱ्या देशांचे प्रमुख, युवराज आणि देशाचे उपाध्यक्ष यांना १९१५ पासून हा सन्मान दिला जात आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा १३ वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

सन्मानाचे स्वरूप म्हणून सन्मानार्थी व्यक्तीच्या शुद्ध सोन्याची माळ घातली जाते. या माळेमध्ये तीन चौकोनी आकाराची सोन्याची नाणी असतात. प्रत्येक नाण्यावर इजिप्तमधील फारोहा काळातील तीन प्रतीके अंकित करण्यात आलेली आहेत. दुष्टशक्तींपासून संरक्षण, नाईल नदीने आणलेली समृद्धी आणि आनंद, तसेच संपत्ती अशी ती प्रतीके आहेत.

हुतात्मा सैनिकांना आदरांजली

पंतप्रधान मोदी यांनी कैरोमध्ये असलेल्या हेलिओपोलिस राष्ट्रकुल युद्ध स्मारकालाही भेट दिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात इजिप्त आणि पॅलेस्टाइन येथे ब्रिटिशांच्या बाजूने लढताना हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांचे हे स्मारक आहे. मोदींनी या सैनिकांना आदरांजली वाहिली. या स्मारकात जवळपास चार हजार भारतीय सैनिकांची नावे आहेत.

ऐतिहासिक मशिदीला भेट

पंतप्रधान मोदी यांनी अकराव्या शतकातील अल हकीम मशिदीला आज भेट दिली. इसवी सन १०१२ मध्ये बांधलेल्या या मशिदीची पाहणी करताना मोदी यांनी भिंतीवर आणि दरवाजांवर कोरलेल्या लिपीचे कौतुक केले.

PM Modi Egypt Visit
PM Modi Egypt Visit : भारतासाठी सुएझ कालवा किती महत्त्वाचा आहे?

ही कैरोमधील चौथ्या क्रमांकाची सर्वांत जुनी मशीद असून दुसरी फातिमिद मशीद आहे. साडे तेरा हजार चौरस मीटर जागेवर ती उभारण्यात आलेली आहे. दाऊदी बोहरा हे इस्लाममधील फातिमी इस्माईल तय्यिबी या विचारसरणी अनुयायी असून ते मूळ इजिप्तमधील आहेत. ते नंतर येमेन व ११ व्या शतकात भारतात स्थायिक झाले. या मशिदीचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला, त्यावेळी भारतातील दाऊदी बोहरा समाजाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता.

पिरॅमिडचीही सफर

कैरोनजीक असलेल्या गिझाच्या पिरॅमिडलाही पंतप्रधान मोदींनी भेट दिली. सात आश्‍चर्यांमध्ये समावेश असलेल्या या पिरॅमिडची त्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. इसवी सन पूर्व २६ व्या शतकात इजिप्तच्या राजघराण्यातील खुफू या फारोहाची कबर असलेला हा जगातील सर्वांत मोठा पिरॅमिड आहे.

PM Modi Egypt Visit
PM Modi In Egypt : PM मोदींचा पुन्हा एकदा गौरव! इजिप्तने सर्वोच्च पुरस्काराने केलं सन्मानित

मोदींनी घेतल्या गाठीभेटी

  • भारताशी संबंध वाढविण्यासाठी इजिप्तने नेमलेल्या मंत्र्यांशी चर्चा

  • इजिप्तमधील लेखक तारेक हेजी यांच्याबरोबर संवाद

  • योगाभ्यास करणारा नादा अदेल आणि रीम जबाक या महिलांबरोबर संवाद

  • हसन आलम होल्डींग कंपनीचे प्रमुख हसन आलम यांच्याबरोबर चर्चा

  • इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शावकी इब्राहिम अब्देल-करीम आलम यांच्याबरोबर चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com