'या' लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; साईड इफेक्ट होत असल्याची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

रशियाच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या 'स्पुटनिक  व्ही' या लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण या चाचणीमध्ये सरासरी सातपैकी एका व्हॉलेंटीअरने साईड इफेक्ट होत आहेत, अशा तक्रारी केल्या आहेत. 

मॉस्को : सध्या जगाला सगळ्यात जास्त कशाची प्रतिक्षा असेल तर ती कोरोना रोगावरील लशीची! विविध देशातील शास्त्रज्ञ आपापल्या पातळीवर लसनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. लसनिर्मितीबाबत सर्वात आधी दावा केला होता तो रशियाने. मात्र रशियाच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या 'स्पुटनिक  व्ही' या लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण या चाचणीमध्ये सरासरी सातपैकी एका व्हॉलेंटीअरने साईड इफेक्ट होत आहेत, अशा तक्रारी केल्या आहेत. 

स्पुटनिक व्ही लस ही रशियातील मॉस्कोमधील गामालया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजीने विकसित केली आहे. आतापर्यंत 40 हजारपैकी 300 हून अधिकजणांना स्पुटनिक व्ही ही लस चाचणी करण्यासाठी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री मिखाइल मुराशको यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, ज्या व्हॉलेंटीअर्सना ही लस देण्यात आली आहे, त्यापैकी जवळजवळ 14 टक्के लोकांना साइड इफेक्ट जाणवू लागले आहेत. यामध्ये थकवा जाणवणे, हलकासा ताप येणे, 24 तासापर्यंत स्नायूंमध्ये दुखणे जाणवणे अशा काही तक्रारी दिसून आल्या आहेत. मात्र ही सगळी लक्षणे तात्पुरती आहेत, असे मिखाइल यांनी सांगितले. रशियातील सरकारी वृत्तसंस्था टासने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

हेही पहा - काय आहे जगभरातील लशींची अवस्था...

हेही वाचा - लशीपेक्षाही मास्कचा वापर अधिक उपयुक्त; अमेरिकन तज्ञांचा निर्वाळा

चाचणीमध्ये लस सुरक्षित आहे की नाही याची तपासणी केली जाते. आणि त्याचबरोबर लसीमुळे प्रतिकार शक्ती वाढते की नाही याचीही खात्री केली जाते. लस दिल्यानंतर काही समस्या निर्माण होत असतील तर लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. काही समस्या जाणवतील असं व्हॉलेंटीअर्सना आधीच सांगण्यात आलं होतं. अशी काही लक्षणे ही आधीदेखील दिसून आली होती. चाचणीत सहभागी झालेल्या व्हॉलेंटीअर्सना दिलेल्या पहिल्या डोसनंतर 21 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. स्पुटनिक व्ही या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही भारतात देखील सुरु होणार आहे. मात्र या लशीमुळे साइड इफेक्ट्स होत असल्यामुळे एकूणच या लशीच्या सुरक्षिततेवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. 

हेही वाचा - काय आहे जगभरातील लशींची अवस्था

लशीच्या चाचणीचे सर्व टप्पे पुर्ण होण्याआधीच रशियाने ऑगस्ट महिन्यात लसनिर्मितीची घोषणा केली होती. मात्र घाईगडबडीत आणि लशीची सुयोग्य चाचणी न करता ती वापरात आणणे धोकादायक असल्याचं अनेक संशोधकांचं म्हणणं होतं. त्यानंतर रशियाने स्पुटनिक व्ही या लशीची चाचणी परदेशी संस्थेच्या देखरेखीखाली करण्याची तयारी दाखवली होती. चाचणीत समोर येणारे निष्कर्ष हे जागतिक आरोग्य संघटनेकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. द लॅसेन्ट या वैद्यकीय नियतकालिकाच्या म्हणण्यानुसार रशियन लशीच्या चाचणीचा पहिला व दुसरा टप्पा हा यशस्वी झाला आहे. 

रशियाने आपली लस आपल्या नागरिकांसाठी खुली केली आहे. याव्यतिरिक्त कझाकिस्तान, ब्राझील, मेक्सिकोमध्येही रशिया आपली लस पुरवणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question on Russian vaccine about efficiency