
भारत आणि अमेरिकेच्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या चीनला आता रशियाकडूनही धक्का बसला आहे.
मॉस्को, ता. २७ (पीटीआय): भारत आणि अमेरिकेच्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या चीनला आता रशियाकडूनही धक्का बसला आहे. चीनला एस-४०० मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा करण्यास रशियाने स्थगिती दिली आहे. काही देशांच्या दबावाखाली रशियाने हा निर्णय घेतल्याचे चीनने म्हटले आहे. अर्थात त्याने यावेळी नाव घेतले नाही, मात्र चीनचा अंगुलीनिर्देश भारत आणि अमेरिकेकडे आहे. एस-४०० हे जगातील सर्वोत्तम मिसाइल यंत्रणा मानली जाते. रशियाव्यतिरिक्त चीन आणि तुर्कस्थानकडे अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा उपलब्ध आहे. भारताला या क्षेपणास्त्राची पहिला संच यावर्षी मिळणार आहे.
कधी मिळणार क्षेपणास्त्र
चीनला आता क्षेपणास्त्र कधी मिळणार हे सांगता येणार नाही. रशियाने एस-४०० चे वितरण थांबवताना त्याचा पुरवठा कधी होणार याबाबतही ठोस माहिती दिलेली नाही. चीनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केवळ शस्त्र खरेदीचा करार करुन भागत नाही तर ते शस्त्र मिळवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. रशियाने दबावापोटी क्षेपणास्त्राचे वितरण थांबवल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. चीनच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, कोरोना संसर्गाच्या काळात एस-४०० चा पुरवठा केला तर चीनच अडचणीत येईल, असे रशियाला वाटते.
हे वाचा - चीन-अमेरिका वाद टोकाला; अमेरिकेने ध्वज उतरविला
भारत विरुद्ध चीन
भारताअगोदर चीनने क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिला संच त्यांना २०१८ रोजी मिळाला होता.त्याचवेळी भारताला यावर्षाखेरीस यंत्रणेचा पहिला संच मिळणार आहे. विशेष म्हणजे चीनचा पुरवठा थांबवलेला असताना भारताला वेळेवर संच देण्याचा पुनरुच्चार रशियाने केला आहे.
पुरवठा थांबवण्यामागचे हे एक कारण
रशिया आणि चीन यांच्यात मैत्री आहे. परंतु आता पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी सेंट पिटसबर्ग आर्कटिक सोशल सायन्स ॲकेडमीचे अध्यक्ष व्हेलरी मिटको यांना अटक केली होती. व्हेलरी यांच्यावर गुप्तचर संस्थांकडून पाळत ठेवली जात होती. पैशाच्या मोबदल्यात व्हेलेरी यांनी चीनच्या सैनिक क्षमतेबाबतची संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्या अन्य तीन साथीदारांना देखील अटक केली होती. त्यात दोन चिनी नागरिकांचा समावेश होता. त्यानंतर उभय देशात तणाव निर्माण झाला.
हे वाचा -अमेरिका-चीन संबंधांचे काटे उलट्या दिशेने
एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा
एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा ही एस-३०० चे अत्याधुनिक रुप आहे. चारशे किलोमीटरपर्यतच्या परीघांत येणारी क्षेपणास्त्र आणि पाचव्या श्रेणीतील लढाउ विमान पाडण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.एस-४०० हे एखाद्या ढालीप्रमाणे काम करेल. पाकिस्तान आणि चीन यांच्या अण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रापासून भारताचे संरक्षण करण्याचे काम ही यंत्रणा करेल. ही यंत्रणा एकाचवेळी ७२ क्षेपणास्त्रांचा मारा करु शकते.
एस-४०० क्षेपणास्त्र अमेरिकेचे अत्याधुनिक लढाउ विमान जेट एफ-३५ ला देखील पाडू शकते. त्याचवेळी ३६ अण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राला देखील नष्ट करु शकते. चीन, तुर्कस्थाननंतर ही यंत्रणा खरेदी करणारा भारत तिसरा देश आहे.