रशियाने तयार केली जगातली पहिली कोरोना लस; सर्व चाचण्या यशस्वी!

Russia_Covid_Vaccine
Russia_Covid_Vaccine

मॉस्को (रशिया) : गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातील पाच लाखांहून अधिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे या व्हायरसला आवर घालणारी लस कधी येणार याकडे जगभरातील सर्वांचे लक्ष्य लागून राहिले होते. मात्र आता लवकरच कोरोनाचा कायमचा बंदोबस्त होईल, अशी माहिती पुढे आली आहे. 

जागतिक महासत्ता अशी ओळख असणाऱ्या रशियाने कोरोनाची लस तयार केली आहे. सेचेनोव फर्स्ट मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना यामध्ये यश आलं आहे. रशियन शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन मेडिसिन अॅण्ड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादिम तारासोव यांनी दिली. त्यामुळे ही जगातील पहिली कोरोना लस शोधून काढण्याचा मान आता रशियाला प्राप्त झाला आहे. 

१८ जूनपासून रशियाच्या गमलेई इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीद्वारे तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर रविवारी सेचेनोव विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर प्रभावी अशी जगातील पहिली लस तयार केली आहे. 

सेचेनोव विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटॉलॉजी, ट्रॉपिकल अॅण्ड वेक्टर-बोर्न डिसिज विभागाचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासाच्या या टप्प्याचे उद्दिष्ट म्हणजे मानवी आरोग्यासाठी ही लस सुरक्षित ठरली आणि त्याची यशस्वी चाचणीही झाली. सध्या बाजारात असलेल्या लसींपेक्षा ही लस अधिक सुरक्षित असल्याचेही लुकाशेव यांनी रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकशी बोलताना सांगितले. 

लसीच्या विकास आणि उत्पादनाबाबत निर्मात्यांनी धोरणे आधीच ठरविलेली आहेत. मात्र, ही जागतिक महामारी लक्षात घेता त्याचे उत्पादन तोकडे पडेल, असेही लुकाशेव यांनी यावेळी स्पष्ट केले.

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना सेचेनोव विद्यापीठाने फक्त एक शिक्षण संस्था म्हणून नव्हे, तर एक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानांनी सुसज्ज असे संशोधन केंद्र म्हणून कार्य केले. त्यामुळे जटील अशा औषध निर्मितीमध्ये आपण भाग घेण्यास आता सक्षम आहोत, असे तारासोव यांनी नमूद केले.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com