US Election 2020: शांत राहा ! आपण जिंकतोय, जो बायडन यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

आपण विरोधक असू शकू पण आपण शत्रू नाहीत, आपण अमेरिकन्स आहोत, असेही बायडन म्हणाले. 

वॉशिंग्टन US President Election 2020- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. बायडन विजयापासून काही पावले दूर असले तरी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानण्यास तयार नाहीत. ते आता न्यायालयात गेले आहेत. दरम्यान, जो बायडन यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. आकडेवारीच स्पष्टपणे सांगत आहे, आपण सहजपणे जिंकतोय, असे बायडन यांनी म्हटले आहे. 

ते पुढे म्हणाले की, अमेरिकेतील यंदाची निवडणूक खूप कठीण होती. पण आपल्याला शांत राहावं लागेल. लोकांना थांबवणं कठीण आहे, पण मला याची पर्वा नाही. मी ते होऊ देणार नाही. लोकशाहीबद्दल आमचे ठाम मत आहे. पण, राजकारणाचा उद्देश देशासाठी काम करणे आहे. आपण विरोधक असू शकू पण आपण शत्रू नाहीत, आपण अमेरिकन्स आहोत, असेही बायडन म्हणाले. 

तत्पूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर निशाणा साधला आहे. बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी चुकीचा दावा करु नये. हा दावा मी ही करु शकतो. आता कायदेशीर कारवाई सुरु होत आहे, असे टि्वट ट्रम्प यांनी केले आहे. 

हेही वाचा- US Election 2020: बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदावर चुकीचा दावा करु नये- डोनाल्ड ट्रम्प

बायडन यांचा विजयाचा दावा चुकीचा आहे आणि निवडणुकीतील शर्यत अजून संपलेली नाही, असे ट्रम्प यांच्या प्रचार पथकाचे जनरल कौन्सिल मॅट मार्गन यांनी म्हटले आहे. जो बायडन हे शुक्रवारी महत्त्वाची राज्ये जॉर्जिया आणि पेन्सिलव्हेनियामध्ये आपले प्रतिस्पर्धी तथा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे गेले आहेत. 

हेही वाचा- US Election : 'जो बायडन अमेरिकेचे प्रेसिडंट'; पेन्सिल्व्हेनियातील विजयानंतर डेमोक्रॅट्स निश्चिंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election 2020 joe biden says we are going to win