US Election : आता तरी पराभव मान्य करा, डोनाल्ड ट्रम्प यांना पत्नीचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

ट्रम्प यांचे जावई आणि त्यांचे सल्लागार जेरेड कुश्नर यांनी यापूर्वीच निकाल मान्य करण्याची विनंती केलेली आहे. 

वॉशिंग्टन- अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विजय मिळवला आहे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा पराभव काही केल्या मान्य नाही. आपणच विजयी असून निवडणुकीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार झाला आहे. त्यामुळे आपण आता न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेवर जगभरातून टीका केली जात आहे. यादरम्यान, ट्रम्प यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनीही त्यांना पराभव मान्य करण्याचा सल्ला दिला आहे. ट्रम्प यांचे जावई जेरेड कुश्नर आणि त्यांच्या नजीकच्या मंडळींनीही पराभव मान्य करण्याचे आवाहन केले आहे. बायडन यांना विजयासाठी आवश्यक असलेल्या 270 पेक्षाही जास्त मते मिळालेली आहेत. 

'सीएनएन'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मेलानिया यांनी निकालावर जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, त्यांनी खासगीत आपले मत ट्रम्प यांच्यासमोर व्यक्त केले आहे. मेलानिया यांनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचारही केला होता. ट्रम्प यांचे जावई आणि त्यांचे सल्लागार जेरेड कुश्नर यांनी यापूर्वीच निकाल मान्य करण्याची विनंती केलेली आहे. 

हेही वाचा- मी शांत बसणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे रडगाणे सुरुच

राष्ट्राध्यक्ष पदासाठी अत्यंत अटीतटीची लढत झाली. पेनसिल्वेनियामध्ये विजयाबरोबरच बायडन यांनी 270 हून अधिक मते मिळवली. बायडन हे तिसऱ्या प्रयत्नात राष्ट्राध्यक्ष पदी पोहोचले आहेत. 78 वर्षांचे बायडन हे अमेरिकेचे सर्वाधिक वयाचे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. 

हेही वाचा- US Election: ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास नकार दिल्यास काय होईल?

अमेरिकी जनतेला निवडणूकीचा खरा निकाल समजणे आवश्‍यकच आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ‘प्रत्येक वैध मत मोजलेच गेले पाहिजे, अवैध नाही. डेमोक्रॅटिक पक्षाने माध्यमे आणि तंत्रज्ञान कंपन्यांना हाताशी धरून माझ्याविरोधात खेळी केली आहे,’ असा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election 2020 melania advises donald trump to accept defeat