US Election:'ट्रम्प बावळट आणि पुतीन यांचे पिल्लू'; बायडेन यांची शेलक्या भाषेत टीका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

पहिल्या डिबेटमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाकडून उभे असलेले उमेदवार जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

युनायटेड स्टेट्स : अमेरिकेत होऊ घातलेली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष  पदाच्या दोन्ही बाजूच्या उमेदवारांमध्ये पहिलं 'प्रेसिडेंशियल डिबेट' घडून आलं. अमेरिकेत निवडणूकीआधी उमेदवारांमध्ये डिबेट घडवून आणायची पद्धत आहे. या डिबेटमध्ये एकूण प्रश्नांवर चर्चा होतात. याचं टेलिकास्ट टिव्हीवरुन केलं जातं. नागरिक या डिबेटना पाहूनही कोण वरचढ आहे आणि योग्य आहे याचा निर्णय घेतात.

पहिल्या डिबेटमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाकडून उभे असलेले उमेदवार जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मंगळवारी बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर आरोप लगावला की ते रशियन राष्ट्राध्यक्ष वाल्मिदिर पुतिन यांचे पिल्लू आहेत. बोलताना मध्येच व्यत्यय आणणाऱ्या ट्रम्प यांना डिबेटचे मॉडरेटर ख्रिस वॉलेस यांनी सुचना दिल्यानंतर बायडेन यांनी रिपब्लिक  पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना बावळट म्हटलं आहे. या बावळट माणसाशी चर्चा करणे अवघड आहे. या व्यक्तीला माफ करा. 

हेही वाचा - भारताने कोरोना मृत्यूची खरी माहिती लपवली; प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ट्रम्प यांचा दावा

या डिबेटमध्ये सुरवातीपासूनच दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. या चर्चेमुळे वातावरण चांगलेच तापले होते. दोघांनी चर्चेचा स्तर सोडून एकमेकांवर घणाघाती आरोप केले आहेत. या डिबेटची सुरवात कोरोना परिस्थिती आणि आरोग्याच्या प्रश्नांवरून झाली. ट्रम्प हे खोटारडे आहेत. त्यांनी आता गप्पच बसावं, असंही बायडेन म्हणाले आहेत. 

दरम्यान, कोरोना व्हायरसवर झालेल्या चर्चेमध्ये ट्रम्प यांनी जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत धक्कादायक असं विधान केलं आहे. अनेक देशांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चुकीची दिल्याचा दावा त्यांनी या डिबेटमध्ये केला. यामध्ये चीन, रशियासह ट्रम्प यांनी भारतानेसुद्धा मृत्यू झालेल्यांची खरी माहिती दिली नाही असं म्हटलं आहे. 

हेही वाचा - नेहरुंना लिहिलेल्या पत्राच्या आधारावर चीनचा लडाखवर दावा; भारताने केला अमान्य

 अमेरिकेत तीन नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीआधी ट्रम्प आणि बायडेन यांच्यात तीनवेळा डिबेट होणार आहे. पुढची डिबेट 15 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबरला नियोजित आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला फक्त एक महिनाच उरला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US election Joe Biden Call Trump Clown US Presidential Debate