चीनवर वारंवार का भडकत आहेत डोनाल्ड ट्रम्प? हा त्यांचा प्लॅन तर नाही ना?

USA_Donald_Trump
USA_Donald_Trump

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीने सगळ्यांनाच जेरीस आणले आहे. मात्र, याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतोय राजकीय नेत्यांना. त्यातही यावर्षी ज्या देशांत निवडणुका होणार आहेत, त्या देशांतील नेत्यांचे कोरोनाने धाबे दणाणले आहेत. आणि या यादीत अव्वल स्थानी आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.

कोरोना या महामारीने पूर्ण जगाला आपल्या कवेत घेण्यास सुरवात केली होती. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना वेगळाच आत्मविश्वास होता. अमेरिका या व्हायरसवर लस शोधून काढेल, असे त्यांना वाटत होते. मात्र, त्यांचा हा अतिआत्मविश्वास त्यांच्या अंगलट आल्याचे अमेरिकेतील सद्यस्थितीवरून दिसून येते. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही कोरोनावरील लस शोधण्यात अजूनही यश आलेले नाही. दुसरीकडे तेथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आतापर्यंत १३,२९,२६० अमेरिकी नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. तर ७९५२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जगातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कमध्ये सध्या व्हेंटिलेटरची कमतरता भासू लागली आहे. परिणामी, न्यूयॉर्कचे गव्हर्नर आणि राष्ट्रपती ट्रम्प यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 

ओबामांनी केली टीका
अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास उशीरा सुरवात केली. आणि त्याचा तोटा आज अमेरिकेला सहन करावा लागत असल्याची टीका माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल केली. त्यामुळे आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी ट्रम्प यांचे विरोधक असलेल्या जो बिडेन यांना समर्थन द्यावे, असे आवाहन ओबामा यांनी अमेरिकी नागरिकांना केले आहे. 

कोरोनामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे कोरोना आणि बेरोजगारीमुळे निराश झालेल्या नागरिकांना आपल्या बाजूने वळविण्याचे मोठे आव्हान ट्रम्प यांच्यापुढे असणार आहे. अमेरिकेत भारतीयांची संख्याही मोठी असल्याने त्यांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत.

चीनवर वारंवार टीका
अमेरिकेत कोरोना व्हायरस पसरण्यास चीन कारणीभूत असल्याची टीका ट्रम्प यांनी सुरवातीच्या काळात व्यक्त केली होती. सामान्य अमेरिकी नागरिक चीनला आपला प्रतिस्पर्धी मानत असल्याने त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची ठिणगी टाकण्यास ट्रम्प कुठेही चूक करणार नाहीत. कोरोनाला आळा घालण्यात आतापर्यंत अपयशी ठरल्याने ट्रम्प यांनी आपला सगळा राग चीनवर काढण्यास सुरवात केली आहे. अमेरिकेच्या शत्रूंना आपण कधीच माफ करणार नाही, अशा काहीशा मूडमध्ये सध्या ट्रम्प दिसत आहेत. 

आरोप सिद्ध कराच : चीन  
वुहान येथील प्रयोगशाळेत कोरोनाची उत्पत्ती झाली असल्याचे आरोप अमेरिकेने चीनवर केले होते. त्यामुळे अमेरिकेने पुराव्यासहित हे आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान चीनने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांना दिले होते. कोरोना कशामुळे पसरला हे पाहणे वैज्ञानिकांचे काम आहे, त्यामुळे निवडणुका पुढे आल्या असताना अमेरिकी नेत्यांनी राजकीय हेतूतून बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा टोलाही चीनने अमेरिकेला लगावला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com