कोरोनाबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा

टीम ई सकाळ
Saturday, 13 February 2021

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

जिनिव्हा - गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तरीही अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेली नाही. आता जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा इशारा दिला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण जगात कमी झालं आहे ही बाब दिलासा देणारी आहे. मात्र यामुळे बेसावध होता कामा नये. 

कोरोनाच्या काळात करण्यात आलेले लॉकडाऊनचे नियम आता शिथिल केले आहेत. अनेक देशात सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे की, कोरोना रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या निर्बंधांमध्ये सूट दिली नाही पाहिजे. जगात सलग चौथ्या आठवड्यात संसर्ग कमी झाला आहे आणि मृतांची संख्या दुसऱ्या आठवड्यातही घटली आहे. 

हे वाचा - थाळी आणि टाळी कोरोना नाही, सरकारला घालवण्यासाठी!

टेड्रोस म्हणाले की, संसर्ग झालेल्यांची आणि मृतांची संख्या कमी आरोग्याबाबतीत लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे शक्य झाल्याचं वाटतं. आम्हीसुद्धा संसर्ग कमी झाल्यानं आनंदी आहे. मात्र यामुळे सध्याच्या परिस्थितीत समाधान व्यक्त करणं हे व्हायरस इतकंच धोकादायक असेल असंही त्यांनी म्हटलं. अजुन वेळ आलेली नाही की कोणत्याही देशांनी निर्बंध शिथिल करावेत. आता जर कोणाचा मृत्यू झाला तर ते खूप त्रासदायक असेल कारण लसीकरण सुरु झालं आहे. लोकांच्या मनात यामुळे भीती निर्माण होईल असंही टेड्रोस यांनी सांगितलं. 

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, जगभरात या आठवड्यात कोरोनाचे 19 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. आधीच्या आठवड्यात हीच संख्या 32 लाख इतकी होती. ससंर्ग कुठून सुरु झाला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचं पथक नुकतंच चीनला जाऊन आलं. त्यातले तज्ज्ञ लवकरच अहवाल सादर करतील.

हे वाचा - दहशतवाद्याकडून डोवाल यांच्या बंगल्याची 'रेकी', व्हिडिओ पाकिस्तानातही पाठवला

जगात आतापर्यंत कोरोनाचे जवळपास 11 कोटी रुग्ण आढळले आहेत. तर 23 लाख 95 हजार 906 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 8 कोटी 8 लाख 36 हजार 328 इतकी आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 8 लाख 92 हजार 550 इतकी झाली असून आतापर्यंत 1 लाख 55 हजार 588 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 38 हजार 253 रुग्ण असून 1 कोटी 5 लाख 98 हजार 709 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who warns restrictions covid-19 cases should not relaxed its dangerous