
Expensive City : जगातील सर्वात महागडे शहर कोणते ? भारतातील शहरे कितव्या स्थानावर ?
मुंबई : वास्तव्याच्या खर्चाचा विचार करता सिंगापूर आणि न्यूयॉर्क ही जगातील सर्वाधिक महाग शहरे आहेत. हा दावा लंडन येथील इकॉनॉमिस्ट लंडन युनिटच्या 'वर्ल्ड वाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे'ने केला आहे.
गतवर्षी पहिल्या क्रमांकावर असणारे ईस्राइलमधील तेल अवीव शहर यावर्षी तिसऱ्या क्रमांकावर आहे. महागड्या शहरांमध्ये राहण्याचा खर्च ८.१ टक्क्यांनी वाढला असून हा गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक दर आहे. युक्रेनचे युद्ध आणि करोनाचा पुरवठा साखळीवरील परिणाम ही त्यामागील कारणे आहेत.
या यादीत बंगळुरू १६१व्या स्थानी, चेन्नई १६४व्या स्थानी आणि अहमदाबाद १६५व्या स्थानी ही भारतीय शहरे आहेत.
सर्वाधिक महागड्या १० शहरांमध्ये न्यूयॉर्क, लॉस एन्जेलिस आणि सॅन फ्रान्सिसको या अमेरिकी शहरांचा समावेश आहे. डॉलरच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वेक्षणात सहभागी २२ अमेरिकी शहरांनी वाढ दर्शवली आहे. यापैकी अटलांटा, शार्लोट, इंडियानापोलीस, सॅन डिएगो, पोर्टलॅण्ड, बोस्टन या शहरांनी सर्वांत जास्त वाढ दर्शवली आहे. अनेक युरोपीय शहरांचा क्रमांक मात्र घसरला आहे.
सर्वाधिक बदल रशियाची राजधानी मॉस्कोच्या क्रमांकात झाला आहे. युक्रेन युद्धामुळे मॉस्को पूर्वीपेक्षा ८८ क्रमांकांनी पुढे गेले आहे तर सेंट पीटर्सबर्गचे स्थान ७० क्रमांकांनी वाढले आहे.
महागाई का वाढत आहे ?
गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक महागाई या वर्षी असण्याचे मुख्य कारण म्हणजे करोनामुळे सलग २ वर्षे पुरवठा साखळी विस्कळीत झाली. चीनमध्ये पुन्हा लागू झालेले करोना निर्बंध, युक्रेन युद्ध, पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध आणि वाढते व्याजदर यांमुळे महागाई वाढते आहे.
सर्वात महाग शहरे
१. न्यूयॉर्क
२. सिंगापूर
३. तेल अवीव
४. हाँगकाँग
५. लॉस एन्जेलिस
६. ज्यूरिख
७. जिनोव्हा
८. सॅन फ्रान्सिस्को
९. पॅरिस
१०. सिडनी
सर्वात स्वस्त शहरे
१. दमिश्क
२. त्रिपोली
३. तेहरान
४. ट्यूनिस
५. ताशकंद
६. कराची
७. अल्माटी
८. अहमदाबाद
९. चेन्नई
१०. कोलंबो