मधुमेह : आजार नव्हे; जीवनशैलीतील बदलामुळे निर्माण होणारी विकृती

Diabetes
Diabetes

बहुतांशी लोकांना मधुमेह म्हणजे एक आजार आहे आणि त्याच्यावर चांगला उपचार उपलब्ध नाही, की ज्या योगे मधुमेह बरा होऊ शकेल. वास्तविक पाहता मधुमेह हा आजार नसून शरीराच्या चयापचय क्रियेत उद्‌भवणारी एक विकृती आहे. ज्याचा रक्तामध्ये दृष्टीस येणारा परिणाम म्हणजे रक्तातील साखर योग्य प्रमाणाबाहेर वाढते. आजतागायतसुध्दा मधुमेहाचे नाते हे केवळ साखरेच्या चयापयप्रक्रियेतील विकृती आहे, असे मानणारे बरेच लोक आहेत, पण वस्तुस्थिती यापेक्षा खूपच भिन्न आहे. 

मधुमेह झाल्यावर केवळ रक्तशर्करेचेप्रमाण केवळ वाढत नसून रक्तामधील मेदघटकांच्या प्रमाणातही फेरफार होतात. याच जोडीला प्रथिनांचीसुध्दा चयापचयक्रिया बिघडते, आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तामधील कॉलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड या मेद घटकांचे प्रमाण वाढते आणि एचडीएल या मेदघटकाचे प्रमाण कमी होते. शरीर संवर्धनाकरीता आवश्‍यक असणारी प्रथिने तयार होण्यात अटकाव निर्माण होतो. म्हणूनच मधुमेह हा आजार नसून ही चयापचय क्रियेतील विकृती आहे आणि त्याचे दुष्परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर अगदी डोक्‍याच्या केसापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत सर्व पेशींवर होत असतात.

मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे शरीरातल्या इन्शूलिन या संप्रेरकाच्या कार्याला शरीरातील पेशींकडून होणारा विरोध हे कारण असते आणि याचमुळे सामान्यपणे सर्वाधिक प्रमाणात दिसून येणारा 'टाईप 2' प्रकारचा मधुमेह होतो. जसजसे मधुमेह झाल्याचा कालखंड वाढायला लागतो, तसतसे इन्शुलिन तयार करणाऱ्या स्वादूपिंडामधील बिटा पेशींवरील ताण वाढू लागतो. याचे कारण म्हणजे इन्शुलिनच्या कार्याला पेशींकडून होणारा विरोध मोडण्यासाठी त्यांना अधिकाधिक इन्शुलिन तयार करुन रक्तामध्ये भिनवावे लागते. या अती ताणामुळे या पेशी मृत होतात आणि शरीरामध्ये इन्शुलिनचा अभाव होतो, आणि सुरुवातीला सौम्य स्वरुपाचा मधूमेह अधिक तीव्र होतो. 

याखेरीज काही रुग्णांमध्ये सुरवातीपासूनच इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या पेशींच्या विरोधात प्रतिजैविके (ऍण्टीबॉडीज) तयार होतात आणि ते या पेशी नष्ट करुन टाकतात. पर्यायाने या टाइप 1 प्रकारच्या मधूमेहामध्ये सुरवातीपासूनच इन्शुलिनची कमतरता असते आणि इन्शुलिनच्या कार्याला होणाऱ्या प्रतिरोधाचे प्रमाण कमी असते. स्त्रीच्या प्रसुतीकाळात गर्भाच्या वाढीसाठी पुरेशा प्रमाणात ऊर्जा पुरविण्यासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये इन्शुलिनच्या कार्याला तात्कालिक प्रतिरोध होत असतो.

या प्रतीरोधावर मात करण्याकरीता स्त्रीच्या प्रसुती काळात मधुमेह होण्याची शक्‍यता असते आणि प्रसुतीनंतर हा मधुमेह बरा होतो. मात्र हा मधुमेह प्रसुतीनंतर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकला, तर त्या स्त्रीला कायमस्वरुपी मधुमेह होण्याची शक्‍यता होते. म्हणून मधुमेहाकडे आजार या दृष्टीकोनातून न बघता शरीराच्या चयापचय क्रियेतील विकृती अशा दृष्टीने बघणे आवश्‍यक आणि ही विकृती निर्माण होण्याची कारणमीमांसा मुख्यत्वे करुन आपल्या जीवनशैलीत आहे आणि काही प्रमाणात अनुवंशीकतेमध्ये आहे.

योग्य जीवनशैलीने आहार, व्यायाम आणि योग्य शास्त्रीय औषध योजना यांनी मधुमेह उत्तम प्रकारे आटोक्‍यात ठेवता येतो. मधुमेहाचे निदान झाल्याझाल्या जर योग्य मार्गदर्शन घेऊन तो वेळीच नियंत्रित ठेवला, तर त्याच्यापासून शरीरावर होणारे दृश्‍य परिणाम टाळता येतात. आजमितीस मधुमेह बरा करणारे कुठलीही उपचारपध्दती जगामध्ये उपलब्ध नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com