Corona : कधी येईल लस आणि काय असेल किंमत; 'सीरम'चे आदर पूनावाल यांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

भारतात लस कधी येणार आणि तिचे वितरण कशाप्रकारे होणार, तिची किंमत काय असेल? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना?

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दररोज लाखोंच्या संख्येने नवे रुग्ण सापडत आहेत. तर आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट देखील आली आहे. भारतातदेखील या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी लस बनवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. डिसेंबरपर्यंत लसवितरणास सुरवात होईल, असं म्हटलं जातंय. भारतात लस कधी येणार आणि तिचे वितरण कशाप्रकारे होणार, तिची किंमत काय असेल? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना?

हेही वाचा - मोदी होणार G-20 समिटमध्ये सहभागी; सौदीचे राजा सलमान यांनी दिलंय निमंत्रण​
कधी येणार लस?
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांचं म्हणणं आहे की ही लस फेब्रुवारीपर्यंत बाजारात येईल. सीरमने ऑक्सफर्डची कोरोना लस एस्ट्राझेनेकासोबत मिळून भारतात ट्रायल घेतल्या आहेत. एका कार्यक्रमात पूनावाला यांनी म्हटलंय की 2021 च्या पहिल्या तिमाहीत लशीचे जवळपास 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध असतील. त्यांनी हेदेखील म्हटलं की आरोग्य कर्मचारी आणि वयस्कर लोकांना ऑक्सफर्डची लस पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत आणि सामान्य लोकांसाठी एप्रिलपर्यंत उपलब्ध होईल. पूनावाला यांनी म्हटलं की 2024 पर्यंत प्रत्यके भारतीयचे  लशीकरण झालेले असेल.

काय असेल लशीची किंमत?
आदर पूनावाला यांचं म्हणणं आहे की, या लशीची किंमत भारतात जास्तीतजास्त 1,000 रुपये असेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, लशीचे दोन डोस दिले जातील. प्रत्येक डोसची किंमत 500 रुपये ते 600 रुपयांच्या दरम्यान असेल. तर सरकारकडून हे दोन्ही डोस सामान्य लोकांसाठी जवळपास 440 रुपयांमध्ये उपलब्ध केली जाईल. त्यांनी म्हटलं की, सरकारला प्रत्येक डोस 3 ते 4 डॉलरमध्ये दिली जाईल. सध्यातरी सरकारकडून याबाबत काहीही अधिकृत माहिती दिली गेली नाहीये. 

हेही वाचा - नियंत्रण रेषेवर गोळीबार नाही; पिनपॉइंट स्ट्राइकबाबत लष्कराचा खुलासा​
कधीपर्यंत सर्वांचे लशीकरण होईल?
पूनावाला यांनी म्हटलं की, भारतात प्रत्येक व्यक्तीचे लशीकरण व्हायला दोन किंवा तीन वर्षे लागतील. फक्त पुरवठा कमी आहे म्हणून नव्हे तर आपल्याला बजेट आणि वितरणाची सुयोग्य व्यवस्था देखील आवश्यक असणार आहे. 

लशीचे ऍडव्हान्स बुकींग
अनेक कंपन्यांच्या ट्रायलचे चांगले परिणाम आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु झाले आहे. त्यामुळे मोठ्या देशांत लशीच्या खरेदीसाठी आणि तिच्या व्यापारासाठी लोक उत्सुक आहेत. अशातच भारताने 150 कोटीहून अधिक डोस खरेदी करण्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग केली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, कोविड-19 लशीचे डोस खरेदी करण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus vaccine what will be the cost & when it will be available