esakal | पेव्हर ब्लॉकवरून धावणे आरोग्यासाठी धोकादायक!
sakal

बोलून बातमी शोधा

पेव्हर ब्लॉकवरून धावणे धोकादायक!

पेव्हर ब्लॉकवरून धावणे धोकादायक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील महापालिकेच्या बहुतांश बागांमध्ये बसविलेल्या पेव्हर ब्लॉकवरून धावण्याचा व्यायाम केल्यास गुडघे तसेच कंबरदुखीचा त्रास उद्‌भवू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेची शहरात सुमारे ११६ उद्याने आहेत. त्यातील उद्यानांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. मात्र, काही नागरिक त्यावरून धावण्याचा सराव करतात. परंतु, ते धोकादायक आहे, असे डॉक्टर सांगतात. धावणे अथवा चालणे यामुळे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. मात्र, पेव्हर ब्लॉक हे सिमेंटचे असतात. त्यासारख्या कठोर पृष्ठ भागावर धावल्यास गुडघे तसेच कंबर दुखीचे विकार होण्याची शक्यता असते. धावताना पाय वारंवार जमिनीवर एकप्रकारे आपटत असतात. यामुळे पृष्ठभागामुळे गुडघ्याला धोका पोहचू शकतो. कारण कठोर पृष्ठभाग सहजतेने दबाव शोषून घेत नाही. त्यामुळे सांध्यांवर ताण येतो. परिणामी गुडघ्यांना सूज येणे, कंबर दुखणे, टाच दुखणे अशा समस्या उद्भवतात.

हेही वाचा: नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नाही- शरद पवार

पेव्हर ब्लॉक्स हे कालांतराने हलल्यामुळे ते असमान होतात. त्यामुळे पाय मुरगळण्याची भीती असते. पृष्ठभाग गुळगुळीत होऊन धावताना पडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे पेव्हर ब्लॉकवरून धावणे धोकादायक असल्याचे डॉक्टर सांगतात.

दरम्यान, महापालिकेच्या उद्यान विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पेव्हर ब्लॉकवरून चालणे अपेक्षित आहे. त्यावरून धावू नये. त्यासाठी काही ठिकाणी आम्ही सूचना फलक लावले आहेत. शक्य तेथे नागरिकांना समजावूनही सांगतो.

हेही वाचा: खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी; वाहनांच्या रांगा

''धावण्याचा व्यायाम करताना पृष्‍ठभाग कठीण नको. मातीचा ट्रॅक सर्वोत्तम. मात्र, उद्यानांतील पेव्हर ब्लॉकवर धावणे अत्यंत धोकादायक आहे. केवळ गुडघे नव्हे तर, मणक्याही इजा पोचू शकते. सांधेदुखी असलेल्यांनी तर, या बाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.''

- डॉ. अतुल सोनावणे, अस्थिरोगतज्ज्ञ

''चालणे, धावणे हा व्यायामप्रकार सर्वोत्तम आहे. मात्र, तो करताना काही काळजी घ्यायला हवी. दोन्ही प्रकारचा व्यायाम करताना कठोर पृष्ठभाग टाळणे गरजेचे आहे. तसेच धावल्याने जर वेदना जाणवत असतील तर फक्त घरगुती उपचार न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.''

- डॉ. विनील शिंदे, अस्थिरोगतज्ज्ञ

अशी घ्या काळजी....

  • उत्तम दर्जाचे रनिंग शूज वापरावेत

  • माती, गवत असलेल्या भागावर धावावे

  • धावण्यापूर्वी हलके व्यायामप्रकार करावेत

  • असमान पृष्ठभागावर धावू नये

हेही वाचा: पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक

loading image