esakal | शोध स्वतःचा : वन्दे गुरूणां...
sakal

बोलून बातमी शोधा

Devyani M

शोध स्वतःचा : वन्दे गुरूणां...

sakal_logo
By
देवयानी एम.

लहानपणी गर्दीतून चालत जाताना काळजी नसायची, कारण हात आईने धरलेला असायचा. ते हात पकडणं न हरवण्यासाठी किती महत्त्वाचं होतं. फक्त हातात हात दिला की इकडं-तिकडं बघत आजूबाजूच्या दृश्याचा उत्सुकतेनं आनंद घेत छोटी पावलं वाटेनं चालत असत. असंच आयुष्याचा अखंड मार्ग दाखवणारे, कधीही हरवू न देणारे, पडू तिथं उठायला मदत करणारे आपले गुरू आपला हात घट्ट धरून असतात. आपल्याला जायचं कुठं हे त्यांना माहीत असतं, आपल्याला विसर पडला तरी ते आपली पावले वाटेवरून भरकटू देत नाहीत. बोलता देखील न येणाऱ्या बाळाला नक्की काय होतं आहे हे आईला अचूक कळतं, कारण त्याची नाळ तिच्याशी जोडलेली असते. आपल्या गुरूंबरोबर तर आपली अंतरात्म्याची जन्मोजन्मीची नाळ जोडलेली असते.

गुरू एक आधारस्तंभ

व्यावहारिक जीवनात अनेक क्षेत्रात हात धरून शिकवणारे गुरू किंवा आधारस्तंभ भेटतात. संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा, शाळेत किंवा महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक विषयातील वेगवेगळे गुरू स्वरूप शिक्षक इत्यादी रूपानं ते भेटतात. आपण दर वर्षी गुरुपौर्णिमेला या सर्वांच्या ऋणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आदिनाथ हे नटराज रूपानं संगीत-नृत्य क्षेत्रात, तर गणपती ६४ विद्या १६ कलांचे अधिपती, तर माता सरस्वती वीणा-पुस्तक धारिणीच आहे. दत्तात्रेयांनी चोवीस गुरू मानलं, असं म्हणतात. म्हणजे प्रत्येकातून काय बोध घ्यायचा आहे हे त्यांनी सांगितलं. कारण जगातील प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकायला मिळतं. वाईट गोष्टींपासून काही दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे, हे शिकायला मिळतं. पण इथं गुरू हा शब्द शिक्षक या अर्थाने वापरला आहे.

हेही वाचा: हेल्दी फूड : लॉकडाउनमधील वजनातील वाढ आणि आरोग्य

आध्यात्मिक गुरू कोण?

परंतु जीवनात आध्यात्मिक गुरू मिळणं हे मोठे भाग्याचं लक्षण आहे. असे म्हणतात, ‘When the student is ready the teacher appears.’ हे रेडी असणं काय आहे? ज्याला आतून तळमळ लागली असेल, त्यालाच ते भेटतात. धावत धावत ट्रेन पकडण्यानं प्रवास संपत नाही, तर फक्त धावणं संपतं आणि खरा प्रवास सुरू होतो. आध्यात्मिक गुरू आयुष्यात आले, की आपला आतला प्रवास खऱ्या अर्थानं योग्य दिशेनं सुरू होतो. पण गुरू कायम त्यांच्याशी आपल्याला बांधून ठेवत नाहीत. तुम्ही स्वतंत्र होऊन स्वतंत्र साधना करणं आणि ‘स्व’तःला खऱ्या अर्थानं जाणणं हे त्यांना हवं असतं. सुख-दुःख, आनंद-यातना अशा द्वंद्वांनी भरलेलं आपलं आयुष्य सारखी मनाची ओढाताण करीत असतं. आपणच वाढवून ठेवलेल्या आयुष्याच्या गुंत्यात आणि पसाऱ्यात आपणच गुरफटलेले राहतो. या गुरफटलेल्या मनाला त्यातून सोडवून, बुद्धीला जागृत करणं आणि अतिउच्च शिखराच्या उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी आध्यात्मिक गुरू आपल्या आयुष्यात येतात.

वन्दे गुरूणां चरणारविन्दे संदर्शितस्वात्मसुखावबोधे।

जनस्य ये जाङ्गुलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै॥

loading image