सफरचंदापेक्षा पेरू लयभारी; सी व्हिटॅमिनचा मोठा स्त्रोत, पचनक्रिया सुधारण्यास महत्त्वाचे फळ

मधुकर कांबळे
Thursday, 14 January 2021

पाणथळ जमीन वगळता कोणत्याही प्रकारच्या जमिनीत उत्कृष्ट उत्पादन देणाऱ्या पेरू फळपिकात गुणधर्मांच्या बाबतीत सफरचंदालाही मागे टाकण्याची क्षमता आहे.

औरंगाबाद : पाणथळ जमीन वगळता कोणत्याही प्रकारच्या जमिनीत उत्कृष्ट उत्पादन देणाऱ्या पेरू फळपिकात गुणधर्मांच्या बाबतीत सफरचंदालाही मागे टाकण्याची क्षमता आहे. पेरूची घनलागवड फायदेशीर ठरेल असे मत हिमायतबाग फळसंशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले. एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली यांच्यावतीने तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.१२) पहिल्या दिवशी ‘ पेरू लागवड तंत्रज्ञान ' या विषयाने वेबसंवादाला सुरूवात झाली.

पहिल्या दिवशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हिमातयबाग येथील फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी पेरू लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. पाटील म्हणाले, पेरू हे समशितोष्ण हवामानात येणारे महत्त्वाचे फळपीक आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे मृग बहारातील हे फळपिक आहे. गुणवत्तेच्या बाबतीत सफरचंदालाही मागे टाकण्याची क्षमता पेरूमध्ये आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

मात्र सर्दी होते म्हणून या फळाला बदनाम करण्यात आले आहे. सी व्हिटॅमिनचा सर्वात मोठा स्त्रोत पेरू आहे. पचनक्रिया सुधारण्यास पेरू खूप महत्वाचे फळ आहे. तंतुमयता, उष्मांक, कॅलशियम, लोह या फळपीकांतुन मुबलक मिळते. या पीकाची घनलागवड सर्वात जास्त यशस्वी फळपीक सिद्ध झाले असून त्याची शेतकऱ्यांनी लागवड करावी असे मत व्यक्त केले. सिकंदर जाधव, राजेंद्र शेटे यांनी फळपीकाविषयीचे अनुभव कथन केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ काकासाहेब सुकासे यांनी प्रास्ताविक केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guava Fruit More Healthy Than Apple Health News In Marathi Guava Benefit