पित्ताशयातील खड्यांचे वर्गीकरण कोलेस्ट्रॉल स्टोन, पिग्मेंटेडस्टोन, मिक्सस्टोन कोलेस्ट्रॉल स्टोन या तीन प्रकारात केले आहे.
-डॉं. अभिजित पाटील, रत्नागिरी
पित्ताशयातील खडे (Gallstones) हा आजकाल खूप सहजपणे आढळणारा आजार आहे. याचेप्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पित्ताशयातील खड्यांचे निदान होऊ शकतं का? तर त्यावर उत्तर हो आहे. त्यासाठी पित्ताशयातील खडे काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचे ठरतं. आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय नावाची एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते.
जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतड्यात सोडणे. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठराविक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी (Human Digestive System) लहान आतड्यात सोडले जाते. आहारात तेलकट पदार्थांचे प्रमाण जास्त झाले किंवा फायबर पदार्थांचे प्रमाण कमी झालं तर पित्त रसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे-छोटे खडे तयार होतात. हे खडे मटारच्या दाण्यांपासून गोल्फ बॉलच्या आकाराचे असू शकतात.
पित्ताशयातील खड्यांचे वर्गीकरण कोलेस्ट्रॉल स्टोन, पिग्मेंटेडस्टोन, मिक्सस्टोन कोलेस्ट्रॉल स्टोन या तीन प्रकारात केले आहे. स्टोन होण्याचे प्रमाण आपल्या देशात जास्त आहे. ही समस्या कोणाला होऊ शकते व याची लक्षणे काय आहेत? पित्ताशयातील खडे हे स्थूल देहाच्या चािळशीतील महिलांमध्ये (Women) जास्त प्रमाणात असते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. ज्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अति तूपकट व तेलकट खाणे, आहारात तंतूमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्टफूड किंवा जंकफूड खाणे, गर्भधारणा, गर्भनिरोधक औषधे सतत उपाशी राहणे डायबेटीस किंवा यकृताचा आजार असणे या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात.
हल्ली हे खडे सर्व वयांच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळतात. बऱ्याच वेळेला पित्ताशयातील खडे लक्षण किंवा नुकसान न पोहोचवता पडलेले असतात. कधी कधी व्यक्तीला आयुष्यभर हे माहीत नसतं, पण कधी काही कारणाने सोनोग्राफी केली तर याची माहिती मिळते. याची काही लक्षणे दिसली नाही तर यावर उपचार ही फार गरजेचे नसतात, परंतु एखाद्या व्यक्तीस डायबेटीस किंवा यकृताचा आजार असेल तर अशा रुग्णांमध्ये पित्ताशयातील खड्यांचे लक्षणे नसली तरीही उपचार घेणे गरजेचे असते. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसतात त्यांनी यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे असते. सुरवातीची लक्षणे अॅसिडिटीच्या त्रासासारखीच असतात.
प्रचंड वेदना होणे हे त्याचे सुरवातीचे लक्षण आहे. या वेदना पित्ताशयाच्या जागी म्हणजेच पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला जाणवतात. होणाऱ्या वेदना या काही वेळेस एवढ्या जास्त असतात की हृदयविकाराच्या वेदना तर नाहीत ना असा आभास होतो. याचबरोबर मळमळणे, उलटी होणे, उजवा खांदा दुखणे, पाठीत दुखणे, ताप येणे अशी इतरही लक्षणे जाणवतात. जेव्हा या खड्यांमुळे पित्ताशयाचे तोंड बंद होते, तेव्हा पित्ताशयाला सूज येते. असे झाल्यास ताप येणे व वेदना ही लक्षणे दिसू शकतात. यामध्ये तत्काळ उपचारांची गरज असते. वेळीच उपचार न घेतल्यास जीवाला धोका संभवू शकतो.
काही वेळेस पित्ताशयातील खडा अडकून राहिला तर पित्त रस आतड्यात नेणारा मार्ग अरूंद होतो. हे पित्तरस लिव्हरमध्ये साचून कावीळ सारखी लक्षणे दिसू शकतात. याला अवरोधक कावीळ असे म्हणतात. पित्ताशयातील खड्यांचे निदान हे सोनोग्राफी पोटाचा सिटीस्कॅन यावरून करता येते.यावरील उपचार पित्ताशयातील खडे आपल्या आत विरघळून नष्ट करण्याचा कोणताही उपाय नाही काही औषधे आहेत पण ती बरीच वर्षे घ्यावी लागतात. यावरील उपाय म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे पित्ताशय काढले जाते. यासाठी घाबरण्याचे काही कारण नाही, या अवयवाशिवायसुध्दा शरीर सुरळीत कार्यक्षम राहते. ही शस्त्रक्रिया आधुनिक पद्धतीने म्हणजेच दुर्बिणीद्वारे (laproscopy) सुद्धा केली जाते.
जेवणातील तेल तुपाचे प्रमाण योग्य असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल भातावर थोडे साजूक तूप इतके चालेल, पनीर खोबरे व शेंगदाण्याचा ही वापर माफक करावा. तळलेले पदार्थ फास्ट फूड वरचेवर खाऊ नये. जेवणात रोज कोशिंबीर व सलाड घ्यावे. चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळी अशी फळे खावीत. रोज नियमित व्यायाम घ्याव्या. रोज एक तास चालायला जावे.
(लेखक चिरायु हॉस्पिटल येथे (शल्यचिकित्सक) जनरल व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.