मधुमेह आहे? आहारात करा 'हे' बदल!

Diabetes-Diet
Diabetes-Diet

मधुमेह ! आयुष्यभराचा सोबती ! या सोबत्याबरोबरचं आयुष्य आरोग्यपूर्ण आणि आनंदी असावं म्हणून डॉक्‍टर, आहारतज्ञ, व्यायाम मार्गदर्शक सगळ्यांचाच सल्ला खूप महत्त्वाचा असतो. मधुमेहाचं निदान झाल्यावर तुम्ही आहारतज्ञांकडून मार्गदर्शन घेता, त्यांनी ठरवून दिलेला आहार घेता आणि तुमचा मधुमेह आटोक्‍यात राहतो. पण या आहार तक्‍त्यामध्ये काही काही प्रसंगी छोटे मोठे बदल करावे लागतात.

पदार्थांचं स्वरूप, प्रमाण, वेळा, तयार करण्याच्या पद्धती यांत विशेष प्रसंगी बदल करावे लागतात. आणि तरीही समतोल आहार हे मधुमेहींसाठी मुलभूत तत्त्व विसरून चालत नाही. प्रवास, सणवार, समारंभ अशा प्रसंगी; तसंच आजारपणात आहारात महत्त्वाचे बदल करावे लागतात. तर विविधप्रसंगी नेहेमीच्या आहारात कसे आणि कोणते आरोग्यपूर्ण बदल करावेत, हे जाणून घेऊयात. 

प्रवास 

प्रवासाचं नियोजन करतानाच मधुमेहींनी आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा, प्रमाण आणि पथ्य लक्षात ठेवावं. प्रवासात खाण्याच्या वेळा जरी बदलल्या तरी दर तीन साडेतीन तासांनी खायला हवं. प्रवासात आहार हलका, पचायला सोपा असावा. मसालेदार, तेलकट, तिखट, जळजळीत पदार्थ शक्‍यतो टाळावेत. जेवढे शक्‍य होतील तेवढे पदार्थ घरून करून न्यावेत. पराठे, धपाटे, थेपले, खाकरे, भाज्या घालून थालीपीठ, पोळ्या आणि सुक्‍या टिकाऊ भाज्या घरून करून न्याव्यात. लाह्या/पोह्यांचा कमी तेलातला चिवडा किंवा इतर कोरडे पदार्थ जवळ ठेवावेत.

प्रवासातही फायबरचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी ताजी फळं, सालाडच्या भाज्या खायला हव्यात. काळ्या मनुका, सुकं अंजीरही खाऊ शकता. मेथी दाण्यांची पूड, आवळा पूड रोज 2 चमचा पाण्यातून घ्यावी. पाणी आणि पातळ पेयं मिळून किमान ग्लास प्यावीत, हवामानानुसार हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. प्रवासात खाण्यापिण्याचं प्रमाण योग्य ठेवावं. खूप जास्त किंवा खूप कमी करू नये. कायम जवळ साखरेची पुडी किंवा लिमलेटच्या गोळ्या किंवा खजुराच्या बिया ठेवाव्यात. रक्तशर्करा एकदम कमी झाली तर घेता येईल. 

सणवार 

सणवार असले की बरेचदा मधुमेहींचं कुपथ्य होतं. आहारात गोड पदार्थ, तळलेले, तेलकट, तुपकट पदार्थांचं प्रमाण वाढल्यामुळे पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि उष्मांक वाढतात. ठरलेला व्यायाम, ठरलेल्या वेळी बरेचजण करू शकत नाहीत. त्यामुळे रक्तशर्करा एकदम खूप जास्त वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच सणवार असतानाही आहार घटकांमध्ये समतोल ठेवावा लागतो. पदार्थ तयार करण्याच्या आरोग्यदायी पद्धती म्हणजेच भाजणे, वाफवणे, बेकिंग, ग्रील करणे वापराव्यात. तळलेले पदार्थ शक्‍यतो टाळावेत.

थोड्याशा प्रमाणात पक्वान्न किंवा तेलकट पदार्थ खायचा असेल तर; त्या ऐवजी नेहेमीच्या जेवणातील पोळी किंवा भाकरी किंवा भात कमी करावा. गोड पदार्थ खायचे असल्यास, साखर न वापरता पदार्थाला गोडी आणण्यासाठी गोड फळं, गोड सुकामेवा म्हणजेच मनुका, खारीक, सुकं अंजीर वापरावं. सुक्रालोज असणारी स्वीटनर योग्य प्रमाणात म्हणजेच - गोळ्या दिवसभरात वापरू शकता. ह्या सुमारासही, पुरेसे फायबर्स देणारे पदार्थ जसे पालेभाज्या, शेंगांच्या भाज्या, शिरांच्या, सालाडच्या भाज्या, मधुमेहींना चालणारी फळं, सालासकट धान्यं, मोड आलेली कडधान्य आहारात हवीत. 

समारंभ 

समारंभातील बुफे मध्ये पदार्थ निवडताना मधुमेहींनी विशेष काळजी घ्यायला हवी. आपल्याला ठरवून दिलेला आहार, त्यातील पिष्टमय पदार्थांचं म्हणजेच पोळी, भात यांचं प्रमाण, भाज्या, सलाड, डाळी यांचं ठरलेलं प्रमाण लक्षात ठेवावं. आपल्याला चालणारे पदार्थ म्हणजेच पोळी किंवा फुलका, आळूच्या भाजी सारखी भाजी, कच्ची कोशिंबीर, भाज्यांचं सार किंवा सूप, ताक भरपूर घेऊ शकता. पण तळलेले पदार्थ, पक्वान्न शक्‍यतो घेऊ नयेत आणि घ्यायची असतील तर तेवढ्याच प्रमाणात पोळी किंवा फुलका किंवा भात कमी करावा. 

पार्टीमध्ये जायची वेळ आल्यास मद्यपान शक्‍यतो करू नये. अल्कोहोलच्या प्रत्येक ग्राम मधून कॅलरीज पुरवल्या जातात. मद्यपानामुळे मधुमेहाची औषधं किंवा इन्शुलीनचा परिणाम लवकर होतो. मद्यपानाबरोबर घेतले जाणारे तळलेले, तेलकट पदार्थ काजू, शेंगदाणे यांमुळे उष्मांक खूपच वाढतात. मद्यपान करून उशिरा किंवा अर्धवट जेवण मधुमेहींसाठी घातक ठरू शकतं. म्हणूनच मधुमेहींनी मद्यपान टाळावं आणि करायचं असेल तर त्याचं प्रमाण, त्याबरोबरचा आहार काटेकोरपणे ठरवून घेऊन पाळावा. 

आजारपण 

आजारपणात बहुतेकदा इन्फेक्‍शनमुळे रक्तशर्करा वाढते. त्यामुळे मधुमेहाची नेहेमीची औषधं बंद न करता वरचेवर साखर तपासून, डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. आजारपणामुळे नेहेमीचं जेवण जात नसेल तर दर - तासांनी पातळ पेयं घ्यावीत. काही वेळा घट्टसर पेयं किंवा मऊ पदार्थही चालतात. प्रथिनं, जीवनसत्त्व, खनिजं आणि आवश्‍यक प्रमाणातील पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थ पुरवले जातील याची खात्री करावी.

लिंबू, आवळा, कोकम सरबत साखरेऐवजी स्वीटनर वापरून घेता येतील. शहाळ्याचं पाणी, अधमुऱ्या दह्याचं ताक, दूध, ताज्या फळांचा रस, व्हेज क्‍लीअर सुप्स, कडधान्यांचं कढण, वरणाचं पाणी, क्‍लीअर चिकन सूप, भाताची पेज, कांजी, नाचणी किंवा ज्वारीच्या पिठाची आंबील, स्वीटनर वापरुन केलेल्या पातळसर खिरी, मुगाच्या डाळीची पातळसर खिचडी असं काही न काही थोड्या थोड्या वेळानं घ्यावं. 

उलट्या किंवा जुलाब होत असल्यास, रक्तशर्करा एकदम कमी होऊ शकते. अशावेळी आहारात थोडी साखर वापरावी. डीहायड्रेशन होऊ नये म्हणून दिवसभरात कमीतकमी - ग्लास पाणी आणि इतर पातळ पदार्थ घ्यावेत. 

रक्तातील साखर तपासून त्याप्रमाणे औषधांचा डोस ठरवून त्यानुसार आहाराचं प्रमाण ठरवावं लागतं. तब्येत जसजशी सुधारेल, तसतसा आहाराच्या स्वरुपात बदल करावा. अगदी पातळ पेयांऐवजी घट्टसर पेयं, नंतर मऊ पदार्थ आणि नंतर नेहेमीचा आहार घ्यावा. 

हायपोग्लायसिमिया 

हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाजवीपेक्षा कमी होणे. दरदरून घाम सुटणे, डोकं दुखणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे, हातपाय थरथरणे, गोंधळल्यासारखं होणं, वागण्यात बदल होणं, एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणं अशी लक्षणं दिसल्यास हायपोग्लायसिमिया झालाय असं समजावं. वेळीच उपचार केले नाहीत तर रक्तशर्करा मिलीग्राम पेक्षा कमी होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

काही वेळा बेशुद्धावस्था येऊ शकते. म्हणूनच हायपोग्लायसिमियाची लक्षणं दिसल्यास ताबडतोब काहीतरी खायला हवं. शक्‍यतो गोड पदार्थ साखर, गुळ, खजूर, गोड पेय, लिमलेटची गोळी किंवा चॉकोलेट, जेली स्वीट्‌स घ्यावीत. एकाच वेळी 2 चमचे साखर किंवा 2 लिमलेटच्या गोळ्या घ्याव्यात. ग्लासभर सरबतात 2 चमचे साखर घालून किंवा ग्लुकोज पावडर घालून घ्यावी. ताज्या फळांच्या रसात साखर घालून घेऊ शकता. 

मिनिटांनी परत रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून, ते जर कमी दिसलं तर हीच उपचारपद्धती परत घ्यावी. हायपो मुळे व्यक्ती जर बेशुद्ध झाली असेल तर त्या व्यक्तीस पाणी पाजू नये. गालाच्या आत, जिभेखाली ग्लुकोजची पावडर ठेवावी. अति गंभीर हायपो असेल तर हॉस्पिटलमध्ये भरती करून, शिरेतून ग्लुकोजचं इंजेक्‍शन द्यावं लागतं. 

अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगानुरूप आहारात योग्य ते बदल करून मधुमेही आपली रक्तशर्करा आटोक्‍यात ठेऊ शकतात. मधुमेह कायमच नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य अन्नपदार्थ, योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे खूपच महत्त्वाचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com