World Pneumonia Day 2021:  कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपायांमुळे न्यूमोनियाविषयी वाढतेय जागरूकता  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

world pneumonia-day

न्यूमोनिया हा जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य विकार असून 2019 मध्ये जगभरात 25 लाख नागरिक मृत्यूमुखी पडलेत. यात 6 लाख 72 हजार लहान मुलांचा समावेश आहे. कोरोना महामारीमुळे 'न्यूमोनिया' हा शब्दच भीतीदायक झाला असून याविषयी अधिक जनजागृती करणे महत्वाचे आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपायांमुळे न्युमोनियाविषयी वाढतेय जागरूकता 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

न्यूमोनिया हा जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य विकार आहे. कोरोना महामारीमुळे 'न्यूमोनिया' हा शब्दच भीतीदायक झाला असून याविषयी अधिक जनजागृती करणे महत्वाचे आहे.12 नोव्हेंबर हा दिवस न्यूमोनियाविषयी जागरुकता करण्यासाठी जागतिक न्यूमोनिया दिन म्हणून पाळला जातो.

लहान मुलांमध्ये न्यूमोनियाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एक सुरक्षित उपाय आहे. त्याशिवाय नवजात बालकांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत मातेने स्तनपान देणे, लहान मुलांच्या संपर्कात धूम्रपान टाळणे, तसेच मुलांना पोषक आहारासह प्रदूषण नसलेल्या मोकळ्या हवेत नेणे, याद्वारेही बालकांना होणारा न्यूमोनिया टाळण्यासाठी मदत होऊ शकेल, असे मत जागतिक न्यूमोनिया दिनानिमित्त वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

साधारणपणे 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतची लहान मुले आणि 65 वर्षांच्या वरच्या व्यक्तींनाही न्यूमोनिया होऊ शकतो. पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये न्यूमोनियापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण हा सर्वांत चांगला उपाय आहे. न्यूमोनियाच्या आजारात फुफुसामध्ये संक्रमण अथवा फुफ्फुसांमध्ये कफ होतो. न्यूमोनियामुळे फुफ्फुसांमध्ये शुद्ध हवेचा प्रवाह येण्यात अडथळा येतो आणि त्यामुळे शरीरामधील ऑक्सिजनची पातळी कमी होते. न्यूमोनियाच्या प्रार्दुभावामुळे  श्वास घेताना त्रास होणे, श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणे, खोकला, ताप, थरथरणे किंवा थंडी वाजणे, घाम येणे अशी लक्षणे आढळतात.

हेही वाचा: कोरोनाचा न्युमोनिया आणि न्युमोनियात हा आहे फरक

कोरोना-न्यूमोनियाची लक्षणे सारखीच

कोरोना आणि न्यूमोनियाची लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे अनेकांची गफलत होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय चाचण्या करून निदान करून घेणे गरजेचे आहे. ज्या पेशंटना जन्मापासूनच अस्थमा अथवा दम्याचे विकार असतील त्यांनी या काळात काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण आता थंडी सुरु झाल्यामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. तसेच मधुमेह आणि हृदय रोग असलेल्या रूग्णांची तपासणी करून घ्यावी; जर आपल्याला खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल तर त्वरित तज्ज्ञांना भेटले पाहिजे.

हेही वाचा: HR-CT स्कोर 19 त्यात न्युमोनिया; तरीही आजींची कोरोनावर मात!

प्रादुर्भाव कमी करण्यात इंटरनेटची मदत

गेल्या काही वर्षांत इंटरनेटच्या मध्यमातून न्यूमोनिया लसीकरणाबद्दल जनजागृती वाढल्यामुळे न्यूमोनियाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे; तरीही जागतिक आरोग्य परिषदेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार जागतिक स्तरावर दर वीस सेकंदांना एक बालक या संसर्गाने मृत्युमुखी पडते आहे. तसेच ज्या वयस्कर मंडळींना श्वसनमार्गाचा किंवा फुफ्फुसांचा जुनाट आजार असतो किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर काही आजार असतात त्यांना श्वसनमार्गाचा संसर्ग झाल्यावर पुढे न्यूमोनिया होण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रात ग्रामपंचायत, नगरपालिका महानगरपालिकेचे कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच शिक्षकांनी कोरोना संक्रमण काळात सर्वेक्षण करून अप्रत्यक्षरीत्या न्यूमोनिया या आजाराविषयी जनजागृती केली आहे.

loading image
go to top