पाटणादेवी-गौताळा अभयारण्यात तब्बल 2 वर्षांनी झाली प्राणीगणना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

animals

पाटणादेवी-गौताळा अभयारण्यात तब्बल 2 वर्षांनी झाली प्राणीगणना!

चाळीसगाव (जि. जळगाव) : कोरोना (Corona) महामारीमुळे दोन वर्षांपासून गौताळा अभयारण्याचा भाग असलेल्या पाटणादेवीच्या जंगलात प्राणीगणना झालेली नव्हती. वन विभागाने बुद्ध पोर्णिमेच्या प्रकाशमय वातावरणात ट्रॅप कॅमेऱ्याच्या सहाय्याने जंगलात तसेच झाडावर बांधण्यात आलेल्या मचाणवर बसून विविध प्राण्यांची नोंद घेतली. प्राणी गणनेत अस्वल व बिबट्यासह ३३२ प्राणी आढळून आले.

राज्यात दरवर्षी बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी प्राण्यांची गणना केली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सध्या परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे सोमवारी (ता. १६) रात्रीपासून प्राणीगणनेला सुरूवात झाली. त्यासाठी जंगलातील १२ पाणस्थळांजवळ झाडांवर ६ मचाण उभारण्यात आले होते. याशिवाय ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या सहाय्यानेही प्राण्यांची नोंद घेण्यात आली. अस्वल, बिबट, रानडुक्कर, मोर, लांडोर, कोल्हा, माकड, भेकर, रानमांजर, ससे, उदमांजर यासारख्या प्राण्यांसह स्वर्गीय नर्तक, कोकीळ, तुईय्या, नाचण, घुबड, सर्प गरूड, धनेश, कोतवालसह इतरही अनेक पक्षी मिळून जवळपास ३३२ प्राणी व पक्षी आढळून आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. रात्रीच्या कीर्रर अंधारात अनेक पक्षांनी आपल्या मधुर आवाजाने निरीक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मंत्रमुग्ध केल्याचे सांगितले. या गणनेचा अहवाल दोन दिवसांत वरीष्ठांना सादर कला जाणार असल्याचे वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांनी सांगितले. गणनेप्रसंगी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे उपस्थित होते.

अशी करण्यात आली नोंद

प्राणी गणनेत बिबट्या- ७, अस्वल-१ , कोल्हा- १, भेकर- २, मोर- ६२, काळवीट- २ , नीलगाय- २२ , रानमांजर- १, उदमांजर- २, रानडुक्कर- १०८, माकड- ७३, ससे- २५, बदक- ४, किंगफिशर- १, बुलबुल-२ , साळुंखी- ३, मुंगुस- ५ , धनेश- ३ , सर्प गरुड- १, फॉटेल- १, ओपारा- १, स्वर्गीय नर्तक-१, कक-१ अशी नोंद करण्यात आली.

''प्राणी गणनेत सहभागी होण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. शेवटी यंदा ती संधी मिळाली. जंगलात प्राण्यांचे निरीक्षण करताना हॉरर चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या. तशाच प्रकारचे दृष्य जंगलात रात्री अनुभवले.'' - संदीप शेंडगे, कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, चाळीसगाव

टॅग्स :CoronavirusJalgaonanimal