Latest Marathi News | दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीचा उत्साह; ७० कोटींची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rush to buy in the marketv

Jalgaon : दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीचा उत्साह; 70 कोटींची उलाढाल

जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पर्वावर खरेदीसाठी ग्राहकांनी बुधवारी (ता. ५) मोठा उत्साह दाखविला. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर बुधवारी निर्बंधमुक्त वातावरणात ग्राहकांनी खरेदीची लयलूट केली. एकट्या सुवर्णबाजारात ग्राहकांनी २५ कोटींचे सोने लुटल्याचा अंदाज आहे.

सोबतच मोठी वाहने, चारचाकी, दुचाकी वाहने, तयार घरे, विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन कपडे, पादत्राणांसह मिठाई, श्रीखंड आदी विक्रीतून सुमारे साठ कोटींपर्यंत बुधवारी बाजारपेठेत उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. सर्वांत जास्त उलाढाल सोने, नवीन घरे, वाहन खरेदीत झाली आहे.

जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हेच चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातील उलाढालीचा आकडा ७० कोटींच्या वर पोचल्याचे सांगितले जात आहे.(Dasara shopping Cross 70 crore turnover Jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon : शहरातील रस्त्यातील ‘खड्ड्यां’ चे कधी होणार सीमोल्लघंन?

आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करताना ग्राहक

आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करताना ग्राहक

सकाळपासून बाजारात गर्दी

सकाळपासूनच बुधवारी ढगाळ वातावरण असले, तरी खरेदीचा उत्साह नागरिकांमध्ये दांडगा होता. सकाळी दहापासूनच सोने, चांदीच्या दुकानात गर्दी होण्यास सुरवात झाली. दुसरीकडे नवीन कपडे, गृहोपयोगी वस्तू, झेंडूची फुले, पादत्राणे, इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली. दुपारी एकच्या सुमारास हलकासा पाऊस झाला. मात्र त्याचा खरेदीवर परिणाम झाला नाही. नागरिक आपापल्या पसंतीच्या वस्तू, कपडे, दागिने घेण्यासाठी सर्वच बाजारपेठांत आले. ज्यांनी दुचाकी, चारचाकी वाहने आरक्षित केली होती त्यांनी ती वाहने घरी नेण्यासाठी वाहनांच्या शोरूमध्ये सहपरिवार गर्दी केल्याचे चित्र होते.

दुपारी नवीन वाहन, दागिने, इतर वस्तू घरी आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर श्रीखंड, पुरी, इतर गोड पदार्थांचा आस्वाद घेण्यात सर्वच कुटुंबीय रमल्याचे चित्र होते.

वाहने, दुकाने फुलांच्या माळांनी सजविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरूच होते. सायंकाळी नवीन कपडे घालून सीमोल्लंघनासाठी जाण्याची धावपळ होती. महिलांनी घराच्या अंगणात आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. एकमेकांना फोनद्वारे, सोशल मीडियातून, शुभेच्छांपत्राद्वारे विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

झेंडूची फुले खरेदी करताना झालेली गर्दी.

झेंडूची फुले खरेदी करताना झालेली गर्दी.

हेही वाचा: Jalgaon Crime : गरीब हमाल तरूणावर चाकूहल्ला

वाहन खरेदी करताना नागरिक.

वाहन खरेदी करताना नागरिक.

विजयादशमीला काही वर्षांपूर्वी सोन्याचा तुकडा खरेदी केला जात असे. दोन-तीन वर्षांपासून सोन्याचे दागिने खरेदीकडे कल वाढला आहे. मंगळसूत्र, पोत, बांगड्या, अंगठी, नेकलेस आदी आकर्षक डिझाइन्सच्या दागिन्यांना मागणी होती.

-मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी,

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

आकडे बोलतात.. (बुधवारी झालेली अंदाजे उलाढाल)

वस्तू--किलो/संख्या --उलाढाल

* सोने-- ५० किलो--२५ कोटी ९० लाख

* चारचाकी बुकिंग--२००--१८ कोटी

* घरे--६००--१५ कोटी

* दुचाकी --५००--४ कोटी ५० लाख* नवीन तयार ड्रेस--- ३ लाख-- १८ कोटी

* इलेक्ट्रॉनिक वस्तू--१ लाख--५ कोटी

हेही वाचा: Crime News : बँकेचे ATM फोडून पैसे लांबविण्याचा प्रयत्न फसला