Jalgaon News: अवैध धंदे वगळून व्यावसायिकांवर गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News

Jalgaon News: अवैध धंदे वगळून व्यावसायिकांवर गुन्हे

जळगाव : अजिंठा चौक ते आर. एल. चौफुलीदरम्यान नव्याने झालेल्या चौपदरी मार्गाच्या दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमणावर एमआयडीसी पोलिसांसह महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (ता. २३) संयुक्त कारवाई केली. रस्त्यालगत दुकाने थाटलेल्यांवर गुन्हे दाखल करत त्यांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईने व्यावसायिकांची चांगलीच भंबेरी उडाली.

एकीकडे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधिमंडळात जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या मुद्यावरून पोलिस दलास धारेवर धरत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदेवाइकांची यादीच वाचून दाखविल्यानंतर खरेतर या धंद्यांवर कारवाई होणे अपेक्षित असताना, एमआयडीसी पोलिसांनी महामार्गालगतचे अतिक्रमण काढत कारवाईचा बडगा दाखविला, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

अतिक्रमणावर कारवाई

महामार्गाच्या दुतर्फा काही स्टॉल लागलेले असतात. स्टॉल्सवर ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. स्टॉल महामार्गाखाली असले, तरी ग्राहक महामार्गावर गाड्या लावून वस्तू खरेदी करतात. त्यामुळे चौपदरी होऊनही मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होतो. या पाश्‍र्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अतिक्रमणाावर कारवाईचा बडगा उगारला.

दुकाने सकाळी दहा ते सहा

कारवाई केलेल्या विक्रेत्यांच्या दाव्यानुसार ते सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंतच दुकाने लावतात. वाहतुकीला कुठलाच अडथळा नाही. शहरात कुठे जागा नाही. महामार्गावर पोलिस स्टॉल लावू देत नाही. पोट भरायचे कसे, असा प्रश्न यापैकी एका विक्रेत्याने उपस्थित केला.

निरीक्षक हिरेंनी घेते ‘सिरीयसली’ पण!

ग्रामीण, शहरी आणि एमआयडीसी अशा संमिश्र आणि सर्वाधिक विस्ताराचे असलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री, सट्टा-पत्ता जुगारावरून हाणामाऱ्या, तांबापुरा, सुप्रीम कॉलनीच्या दंगली, जातीय तेढच्या घटना नित्त्याच्याच आहेत.

या पोलिस ठाण्यावर प्रभारी असणारा अधिकारी एक दिवसही शांततेत बसू शकत नाही. त्यात विधिमंडळात उल्लेख झाल्याने अवैध धंद्यांविरोधात तातडीने कारवाई होणे अपेक्षित असताना, निरीक्षक जयपाल हिरे यांना महामार्गाच्या बाजूला पाल लावून कपडे, गॉगल्स आणि खेळणी विक्रेत्यांची चिड आली.

गुरुवारी थेट फोर्स पाठवून २५-३० विक्रेत्यांना त्यांच्या मालासह ताब्यात घेण्यात आले. महामार्गाशेजारी पोटापाण्यासाठी उन्हातान्हात बसलेल्या गरीब विक्रेत्यांवर साहेबांनी कारवाईचा बडगा उगारून निश्‍चितच पोलिस अधीक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असावे.

साहेब, इकडेपण बघा!

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहरुणच्या महादेव मंदिराजवळ, तसेच अन्य भागांतील सट्ट्यावाल्यांची यादी वाचून दाखवली. त्यावर कारवाईला एमआयडीसी पोलिस धजावलेले नाहीत.

''एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी महामार्गालगत व्यावसायिकांची दुकाने काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला मदत मागितली होती. त्यानुसार अतिक्रमण विभागातील १५ कर्मचाऱ्यांसह पथक, वाहने देण्यात आली. पोलिस दलाच्या मार्गदर्शनात दुकाने काढण्यात आली. जप्त साहित्य पोलिसांनीच त्यांच्या ताब्यात घेतले असून, यासंदर्भात महापालिकेकडे कुठलीच तक्रार आलेली नव्हती.'' -उमाकांत नष्टे, अधीक्षक, अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका

''अजिंठा चौक ते आर. एल. चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो. अपघातांची शक्यता पाहता एमआयडीसी पोलिस आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने या व्यावसायिकांना हटविण्यात आले.'' - जयपाल हिरे, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे

टॅग्स :Eknath KhadseJalgaon