Jalgaon News : GMCत महिलेच्या पोटातून काढला तब्बल 1 किलोचा गोळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Government Medical College and Hospital

Jalgaon News : GMCत महिलेच्या पोटातून काढला तब्बल 1 किलोचा गोळा!

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(GMC) महिलेच्या पोटातून एक किलो वजनाचा गोळा काढून रुग्णास जीवदान देण्यात वैद्यकीय पथकाला यश मिळाले आहे. (GMC medical team was successful in removing 1 kg lump from stomach of woman jalgaon news)

मुंबई येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला मागील सहा महिन्यांपासून पोटदुखी व अतिरक्तस्राव होण्याच्या त्रास होत होता. त्यांना मुंबई येथे खासगी रुग्णालयात गर्भापिशवी काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, खर्च परवडत नसल्याने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली.

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात त्यांना गर्भपिशवीला मोठी गाठ असल्याचे निदान झाले. त्यासाठी दुर्बिणद्वारे गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. दुर्बिणीद्वारे एक किलो वजनाचा गोळा शस्त्रक्रियेद्वारे काढून महिलेला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले.

साकूर (ता. इगतपुरी) येथे राहणाऱ्या महिला रुग्णाला मागील एक वर्षापासून अंगावरून अतिरक्तस्राव होण्याचा त्रास होत होता. त्यांचे हिमोग्लोबिन केवळ सहा होते. त्यामुळे तीन पिशव्या रक्त देण्यात आले. तपासणीअंती रुग्णाला गर्भपिशवीत १५ गाठी होत्या.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

या दोन्ही रुग्णांची गर्भापिशवी दुर्बिणीद्वारे डॉ. मिताली गोलेच्छा व सहकाऱ्यांनी काढली. दोन्ही महिला रुग्णांना अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, विभागप्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे, सहयोगी प्रा. डॉ. संजय बनसोडे यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

या गुंतगुंतीच्या शस्त्रक्रिया सहाय्यक प्रा. डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. प्रदीप लोखंडे, डॉ. संजीवनी अनेराय, डॉ. हेमंत पाटील, भूल तज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, निला जोशी यांनी पार पडल्या.

‘जीएमसी’मध्ये गर्भापिशवी काढणे, कुटुंब नियोजन, वंध्यत्व निवारण, अशा अनेक प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केल्या जातात, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. स्त्रीरोग विभागात नियमितपणे होणाऱ्या दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियाचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.

टॅग्स :JalgaonHospitalMedical