
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापूर्वीच चांदीच्या दरात घसरण; सोनेही उतरले
जळगाव : सोने, चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या चार दिवसात चांदीच्या दरात ६९ हजारांवरून ६५ हजारांपर्यत घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरात ५२ हजार ७०० वरून ५२ हजार २५० घसरण झाली. म्हणजेच चांदीच्या दरात चार हजारांची तर सोन्याच्या दरात ३५० रूपयांची (तोळ्यामागे) गेल्या सात दिवसात घसरण झाली आहे. ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. मंगळवारी (ता. ३) अक्षय तृतीया आहे या दिवशी सोन्याला अधिक मागणी असते. यामुळे सोने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. (Gold and silver rate update)
अक्षय तृतीयेला सोन्याची मोठी विक्री
गेल्या महिन्यात रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोन्याच्या दरात २७०० ची तर चांदीच्या दरात २ हजारांची घसरण झाली होती. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांनी घेतला. सोन्या, चांदीची मोड विकून नफा कमविला आहे. गेल्या काही महिन्यांपासून युद्धात शिथिलता येत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. गेल्या २७ एप्रिलपासूनचा विचार करता सोन्याचे दर प्रतितोळा ५२ हजार ७०० होते. तर चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार होता. ते आज (ता. ३०) अनुक्रमे ५२ हजार ३५० व ६५ हजारापर्यंत खाली आले आहेत.
अक्षय तृतीयेला मोठा मुहूर्त
अक्षय तृतीयेला घेतलेले सोने अक्षय (चिरकाल) टिकते. यामुळे यादिवशी सोने खरेदीची मोठी परंपरा आहे. यादिवशी सोन्याची मोठी विक्री होईल. यासाठी सोने चांदी व्यापाऱ्यांनी सोन्याचे दागिने घडविण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी (ता. ३) अक्षय तृतीया आहे. या दिवशी दर कसे असतील हे सोमवारी समजेल असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सोने, चांदीचे दर असे (जीएसटी विना)
तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)
२२ एप्रिल--५२ हजार ८००--६९ हजार
२३ एप्रिल--५२ हजार ७००--६९ हजार
२६ एप्रिल--५२ हजार--६८ हजार
२७ एप्रिल--५२ हजार ७००--६९ हजार
३० एप्रिल--५२ हजार ३५०--६५ हजार