Jalgaon News : साकळी जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरीचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon news

Jalgaon News : साकळी जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरीचा प्रयत्न

साकळी (ता. यावल) : येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या व मुलींच्या शाळेत दोन खोल्यांचाचे दरवाजे अज्ञातांकडून तोडल्याच्या घटना सलग दोन रात्री घडल्या. यामुळे शाळेच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या शाळेत यापूर्वीही चोरीचे प्रकार घडले आहेत. शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण असल्याने वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे. दरम्यान, या संदर्भात यावल पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या व मुलींच्या शाळेत सोमवारी (ता. ६) रात्रीच्या दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञातांनी शाळेच्या एका वर्ग खोलीचा दरवाजा तोडून तीन हजारांचे नुकसान केले.

तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ७) पुन्हा मुलांच्या शाळेत वर्ग खोलीचा लोखंडी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. शाळेत सकाळी काम करण्यासाठी मजूर आले असता, त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. काही दिवस सलग सुट्या आल्याने वर्ग खोल्यांचे दरवाजे तोडण्याचा हा प्रकार घडला.

येथील मुलांची व मुलींची अशा शाळा डिजीटल झालेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही शाळांच्या प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही, संगणक, प्रिंटरसह इतर महत्त्वाचे शैक्षणिक साहित्य आहे. मुलांच्या शाळेत ज्या वर्गाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला, त्या वर्गात मुलांना शिकवण्यासाठीचा स्मार्ट टीव्ही लावलेला होता. सुदैवाने चोरट्यांकडून दरवाजा उघडला गेला नसल्याने टीव्ही वाचला.

या घटनांनंतर मुलींच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश माळी, मुलांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौरभ जैन, ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी, माजी ग्रामपंचायत सदस्य खतीब तडवी, शदर बिऱ्हाडे, सदस्य नितीन फन्नाटे, सचिन सोनवणे, पंकज जैन, केंद्र प्रमुख किशोर चौधरी व ग्रामस्थांनी भेट दिली व यावल पोलिसांना कळविले.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. यापूर्वी देखील या शाळांमध्ये चोरीच्या काही घटना घडल्या आहेत. दरम्यान, सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी या शाळेच्या वॉल कंपाऊंडचे एका बाजूचे बांधकाम रखडले आहे. या रखडलेल्या कामामुळेच वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :JalgaonCrime Newsschool