
Mahila Sanman Yojana : पाचशेहून अधिक महिलांचे 50-50; विभाग नियंत्रकांकडून स्वागत
जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) सर्व बसमध्ये सर्व महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजना शुक्रवार (ता. १७)पासून लागू करण्यात आली. (Mahila Samman Yojana to give 50 percent discount on passenger fare of State Transport Corporation was implemented jalgaon news)
त्याचा लाभ देण्यास जळगावातही सुरवात झाली आहे. या योजनेच्या पहिल्याच दिवशी साधारण पाचशेहून अधिक महिलांना सवलतीचा लाभ मिळाला.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महिला दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळात महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना ५० टक्के सवलतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली आहे.
या योजनेचे परिपत्रक व पत्र राज्याचे वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पाठविले आहे. त्यात विविध सूचना केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या साधी, मिनी, वातानुकूलित, शिवशाही, शिवाई, शयन आसनी, अशा सर्व प्रकारच्या बसमध्ये ही सवलत लागू केली आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
विभाग नियंत्रकांनी केले स्वागत
राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात परिपत्रकानुसार महिलांना लाभ देण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून सुरवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळपासून निघालेल्या सर्व बसमध्ये ५० टक्के लाभ मिळत असल्यामुळे महिलांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान, सकाळी जळगाव बसस्थानकावर विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी बसमधून प्रवास करत योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.