गलिच्छ राजकारणाचा पाया पूर्वीचाच.. गवंडी बदलले! 

politics
politics

सध्या कथित ‘सीडी’ प्रकरणावरून जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले तसे ते गढूळही झालेय... स्वार्थापोटी किंवा एखाद्यावर सूड उगविण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाणे, हे जिल्ह्याने यापूर्वीही वेगवेगळ्या वेळी अनुभवलेय. त्यामुळे या राजकारणाला आता गलिच्छ म्हटले जात असले तरी त्याचा पाया यापूर्वीच रचला गेलाय... पाया रचणारे गवंडी तेवढे बदललेय... 


जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून सीडी, बीएचआर, वॉटरग्रेस, ‘मविप्र’तील वादातून दाखल गुन्हा या प्रकरणांवरून गदारोळ उडाला आहे. भरीस भर म्हणून त्यात ‘ईडी’च्या नोटिशीचीही भर पडली. म्हणायला सीडी, बीएचआर, वॉटरग्रेस आणि ‘मविप्र’तील वादातून दाखल गुन्हा या वेगवेगळ्या बाबी असल्या तरी त्यांचा प्रवास एकाच दिशेने होत असल्याने त्या प्रवासातील सहप्रवाशांचे एकमेकांशी असलेले संबंधही त्यानिमित्ताने समोर येणे स्वाभाविक आहे. 

लॉन्च न झालेली सीडी
सध्या चर्चेत असलेल्या ‘सीडी’चा प्रवास जामनेरमधून सुरू झालाय, असे म्हणतात. प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीनेही अद्याप कुणासमोरही न आलेली सीडी ‘लॉन्च’ केली. लोढांच्या दाव्यानुसार अशी काही सीडी असेल, तर समाजाच्या भल्यासाठी त्यांनी ती पोलिस खात्याकडे देऊन, अन्यथा पोलिसांनीच स्वत: ताब्यात घेत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. गंभीर बाब म्हणजे या सीडी वादात लोढांनी आठ-दहा वर्षांपूर्वी घडलेल्या निखिल खडसेंच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करून आणखीच खालची पातळी गाठली. अशा प्रकरणांमधून खरंतर आपलीच तुंबडी भरण्याचे प्रकार नवीन नाहीत. त्यामुळे ‘सीडी’च्या नावाखाली केवळ बागुलबुवा होत असेल, तर अशा व्यक्तींनाही धडा शिकविण्याची गरज आहे. दुर्दैवाने या गंभीर प्रकरणात पोलिस विभागही पुढाकार घेऊन कारवाई करण्यास धजावत नाही. 

‘सीडी’ आणि ‘ईडी’
‘सीडी’वरून चाललेल्या खेळात काल-परवा ‘ईडी’ची भर पडली. राष्ट्रवादीत प्रवेश करतेवेळी खडसेंनी जी शक्यता वर्तवली होती, ती खरी ठरली आहे. खडसे भाजपत असेपर्यंत ‘ईडी’ला भोसरी भूखंड प्रकरण आठवले नाही आणि आत्ताच ‘ईडी’ची विवेकबुद्धी जागृत होऊन ‘खडसे हाजीर हो...’चा पुकारा झाला. ‘ईडी’च्या नोटिशीचे ‘टायमिंग’ नक्कीच संशय निर्माण करणारे आहे. 
बीएचआर, सीडी असो वा ईडी... या प्रकरणांना कुणी गलिच्छ राजकारण म्हणत असेल, तर त्याचा अनुभव घेण्यासाठी फार जुन्यात जाण्याची गरज नाही... गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाच ‘सीडी’ प्रकरणातून तत्कालीन खासदाराची राजकीय अन्‌ सामाजिक ‘वास्तू’ भस्मसात झाल्याचा अनुभव ताजा आहे. त्या वेळी ती खेळी कुणी खेळली, याबद्दल मतप्रवाह असू शकतात. पण प्रत्येकाची ‘वेळ’ येते, हे तर आजचा ‘काळ’ सांगत नसेल ना..! 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com