esakal | आमदार चव्हाणांना कोठडीत घरफोड्या ‘भुऱ्या’ची साथ
sakal

बोलून बातमी शोधा

mla mangesh chavan

एकटे आमदार एमआयडीसी पोलिस कोठडीत पवन ऊर्फ भुऱ्यासोबत, तर आमदारांचे सहकारी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या कोठडीत होते. 

आमदार चव्हाणांना कोठडीत घरफोड्या ‘भुऱ्या’ची साथ

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : महावितरण कार्यालयातील राडाप्रकरणी अटकेत असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोठडीत थेट घरफोडीतील सराईत चोरट्यासोबत संगत करावी लागली. आमदाराची निवांत वेळ मिळणे सामान्यांसाठी दुरापास्त. त्यामुळे या चोरट्यालाही रात्रभर ‘खास’दार झाल्यासारखंच वाटलं. 
संबंध महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या पवन ऊर्फ भुऱ्या आर्य (वय ३३, रा. इंदूर) याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला मंगळवार (ता.३०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यातच महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधीक्षक अभियंत्यास खुर्चीला बांधून शिवीगाळ केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना ३१ सहकाऱ्यांसह अटक झाली होती. एकटे आमदार एमआयडीसी पोलिस कोठडीत पवन ऊर्फ भुऱ्यासोबत, तर आमदारांचे सहकारी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या कोठडीत होते. 

कोठडीतील असाही अनुभव 
मध्य प्रदेशातील इंदूर, खंडवा, भोपाळसह महाराष्ट्रात औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक गुजरातमध्ये सुरत अशा तिन्ही राज्यांत जवळपास ४० पोलिस ठाण्यांच्या कोठड्यांमध्ये पवनचे वास्तव्य राहिले. जळगावातही त्याला तेच सर्व अपेक्षितच मिळाले. मात्र, आमदारासोबत त्याला दोन दिवसांचा सहवास लाभला. ‘साहब वो, बडे लोग है (असे, म्हणतच थांबला), लेकिन मुझसे अच्छेसे बात करते थे, क्यो करते हो. ये सब ऐसा भी पुछते थे. मैने सब सच बताया,’ असेही पवन म्हणाला. 
 
भुऱ्याची कर्मकहाणी..
मध्य प्रदेशातील कुख्यात कमल राठोड याच्या सहवासात येऊन इंदूरच्या रामकृष्ण बाग कॉलनीतील पवन ऊर्फ भुऱ्या गुन्हेगारीत आला. ज्या-ज्या कारागृहात राहिला तेथे त्याने प्रत्येक वेळेस नव्या गुन्हेगारांबरोबर गँग बनविली. मोठ्या घरफोड्यांसाठी एक आलिशान कार आणि दोन साथीदार त्याला हवे असतात. छेाट्याशा हातभर टॉमीने ३० सेकंदांत लॉक तोडून आत शिरल्यावर अवघ्या अर्ध्याच तासात घर उलथापालथ करून मिळालेला किमती ऐवज चोरून पळण्यात तो निष्णात आहे. आजवर त्याच्या हाताला कधीच अपयश आले नाही. प्रत्येक गुन्ह्यात मालामाल झाल्याचे तो सांगतो. 

संपादन- राजेश सोनवणे