esakal | आमदारांनी ठेकेदाराला दिला ‘अल्टिमेटम’; रस्त्याचे काम संथगतीने 
sakal

बोलून बातमी शोधा

आमदारांनी ठेकेदाराला दिला ‘अल्टिमेटम’; रस्त्याचे काम संथगतीने 

रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा असा आग्रह आमदार अनिल पाटील यांनी धरला होता, परंतु तरी देखील ठेकेदाराकडून कामाबाबत विलंब होत आहे.

आमदारांनी ठेकेदाराला दिला ‘अल्टिमेटम’; रस्त्याचे काम संथगतीने 

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर : ‘हायब्रीड अम्युइटी’अंतर्गत धुळे रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यातच पर्यायी रस्ता म्हणून शहरातील रस्त्याची वाट लागली आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी धुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेतली. यात दगडी दरवाजासमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आणि शहरातील पर्यायी रस्त्याची डागडुजी करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत ठेकेदारास मुदत दिली आहे. यामुळे ठेकेदाराने गांभीर्याने घेऊन कामाचा वेग वाढविला आहे. 

वाचा-  अरेच्चा : 92 वर्षाचे धनुकाका बनले तरुणांचे 'आयकाँन'

‘हायब्रीड अम्युनिटी’अंतर्गत अमळनेर - धुळे या प्रमुख रस्त्याचे काम होत असून, प्रामुख्याने दगडी दरवाजा ते आर. के. नगरपर्यंतचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने झाल्याने शहरवासीयांची मोठी गैरसोय झाली आहे. याशिवाय हे काम सुरू असतानाच दगडी दरवाजाचा बुरुज कोसळल्याने धोका नको म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यामुळे पर्यायी रस्ता म्हणून गांधलीपुरा मार्गाचा वापर सुरू झाला. परंतु येथून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सुभाष चौक, स्टेशन रोड, कचेरी रोड आदी रस्त्यांची अत्यंत वाट लागली असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे, तसेच दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक अक्षरशः वैतागून धुळे रस्ता कधी सुरू होतोय याची वाट पाहत आहे. दरवाजासमोरील राहिलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा असा आग्रह आमदार अनिल पाटील यांनी धरला होता, परंतु तरी देखील ठेकेदाराकडून कामाबाबत विलंब होत असल्याने आमदार पाटील यांनी तातडीने धुळे बांधकाम कार्यालय गाठून अधिकारी व ठेकेदारासोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत आमदारांनी जनतेचा संयम आता संपला असून, वाहतुकीच्या कोंडीमुळे होत असलेला दररोजचा त्रास आता असह्य होत आहे. यामुळे आता कोणतीही सबब चालणार नसून कोणत्याही परिस्थितीत येत्या २० डिसेंबरपर्यंत धुळे रस्त्याचे दगडी दरवाजासह संपूर्ण काम वेगाने पूर्णत्वास आणून हा रस्ता वाहतुकीसाठी खुलाच झाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना आमदार पाटील यांनी दिल्याने ठेकेदाराने ही अट मान्य करीत जोमाने काम सुरू केले आहे. 

वाचा- दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन पाठींब्यासाठी ‘राष्ट्रवादी’ची तीव्र निदर्शने -

आमदारांकडून कामाची पाहणी 
आमदार अनिल पाटील यांनी दगडी दरवाजासमोर सुरू असलेल्या रस्ता कामाची पाहणी करून कामाबाबत काही सूचना देखील केल्या, तसेच दगडी दरवाजाची देखील त्यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, मार्केटचे माजी संचालक अनिल शिसोदे, देविदास देसले, व्यापारी आघाडीचे दिनेश कोठारी, सचिन बेहरे यासह नागरिक उपस्थित होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image