सरपंच ते महसूलमंत्री अशी स्वयंभू खडसेंची वाटचाल !

सरपंच ते महसूलमंत्री अशी स्वयंभू खडसेंची वाटचाल !

जळगाव ः आता अगदी आमदार किंवा कुठलेही संविधानिक पद नसतानाही राज्याच्या राजकारणात ज्यांचा दरारा आहे, असे नाव... एकनाथ खडसे. कोथळीच्या सरपंचपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल विधानसभेवर सलग सहा वेळा आमदार, भाजप विधिमंडळ गटाचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि युती व फडणवीस सरकारच्या काळात राज्य मंत्रिमंडळातील सदस्य अशी राहिलीय. केवळ विधिमंडळातील नव्हे तर पक्षीय राजकारणातही सामान्य कार्यकर्ता, तालुका उपाध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. 

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाच्या सामान्य शेतकरी कुटुंबात २ सप्टेंबर १९५२ ला एकनाथरावांचा जन्म झाला. अकोला येथे वाणिज्य विषयातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगरातच समाजकारण सुरू केले. विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, अध्यक्ष, कोथळी गावचे सरपंच या स्थानिक पदांपासून सुरू झालेली खडसेंची राजकीय वाटचाल आज चार दशकांनंतरही तशीच अविरत सुरू आहे. १९८० ते १९८५ या पाच वर्षांच्या काळात ते कोथळी गावचे सरपंच होते. याचदरम्यान त्यांचा जनसंघ, भाजपशी संपर्क आला. तेव्हापासून भाजपसोबत जोडले गेल्यानंतर सुरवातीला मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्ष आणि नंतर पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष झाले. 

१९९० ला पहिली आमदारकी 
भाजपच्या उमेदवारांना अनामत वाचविणेही शक्य व्हायचे नाही, अशा काळात १९९० मध्ये त्यांना तेव्हाच्या एदलाबाद (आताचा मुक्ताईनगर) विधानसभा क्षेत्रातून भाजपची उमेदवारी मिळाली. भाषणही करता येत नसलेल्या एकनाथरावांनी या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून मुक्ताईनगर... भाजप आणि एकनाथ खडसे असे समीकरण बनले. त्यानंतर तब्बल तीस वर्षे म्हणजे १९९० ते २०१९ या काळात त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 

युती सरकारमध्ये मंत्री 
१९९५ मध्ये खडसे दुसऱ्यांदा निवडून आले. योगायोगाने तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात खडसेंना सुरवातीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, नंतर अर्थ व नियोजन आणि सरकारच्या शेवटच्या दोन वर्षांतील काळात पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. या तिन्ही खात्यांचा कारभार त्यांनी अत्यंत सक्षम व समर्थपणे सांभाळला. 

तापी खोऱ्याची निर्मिती 
युती सरकारच्या काळात पाटबंधारेमंत्री असताना त्यांनी खानदेश सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्याच्या दृष्टीने तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करून या क्षेत्रात अनेक सिंचन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली. याशिवाय उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असताना तालुकास्तरावर आयटीआय, मुलींसाठी शासकीय वसतिगृहांची निर्मिती यांसारखी कामे उभी केली. 

आक्रमक, अभ्यासू विरोधी पक्षनेते 
१९९९ मध्ये युतीचे सरकार गेले. मात्र, खडसे तिसऱ्यांदा निवडून आले. तेव्हापासून २०१४ पर्यंत ते सातत्याने विधानसभेवर निवडून आले. १९९९ ते २०१४ अशा १५ वर्षांच्या कार्यकाळात ते विधानसभेत गटनेते, २००९ ते १४ विरोधी पक्षनेते होते. या काळात त्यांनी आपल्या अभ्यासू, आक्रमक भाषणांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात अक्षरश: रान पेटवून भाजपची एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आणि राज्यात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला. 

महसूलसह बारा खाती 
२०१४ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात खडसेंकडे महसूल, मदत व पुनर्वसन, कृषी, उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक, मत्स्य व पशुसंवर्धन-दुग्धविकास अशा विविध १२ खात्यांची जबाबदारी होती. ती त्यांनी जून २०१६ पर्यंत समर्थपणे सांभाळली. 

आरोप आणि राजीनामा 
मे २०१६ मध्ये खडसेंवर विविध प्रकारचे आरोप झाले. दाऊदच्या पत्नीशी संभाषण, कथित स्वीय सहाय्यकाचे लाच प्रकरण, भोसरी जमीन खरेदी आदी आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. भोसरी जमीन खरेदी प्रकरण वगळता अन्य सर्व आरोपांत त्यांना क्लीन चिट मिळाली. मात्र, त्यांचे पुन्हा पुनर्वसन होऊ शकले नाही. पक्षात वारंवार डावलल्याची भावना त्यांनी केंद्रीय नेतृत्वापर्यंत व्यक्त केली, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात येऊन त्यांची कन्या ॲड. रोहिणी यांना तिकीट मिळाले, मात्र त्यांचा पराभव झाला. नंतरही पक्षाकडून विधान परिषदेवर घेण्याचे आश्‍वासन मिळाले, मात्र ते पूर्ण झाले नाही. अखेरीस बुधवारी, २१ ऑक्टोबरला त्यांनी भाजपचा त्याग करत राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा केली.  

खडसेंचे सीमोल्लंघन : फडणवीसांशी वादाची अशी पडली ठिणगी 

- ऑक्टोबर २०१४ : राज्यात भाजपचे सरकार 
-ऑक्टोबर : २०१४ : मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस 
- बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हवा होता : खडसेंच्या वक्तव्यावरुन वाद 
- खडसेंकडे महसूल, मदत व पुनर्वसन, राज्य उत्पादन शुल्क, कृषी यासह १२ खात्यांचे मंत्रिपद 
- फडणवीस मुख्यमंत्री तरीही मंत्रालयात खडसेंचाच दरारा 
- खडसेंच्या मंत्रिमंडळ बैठकीतील वर्चस्वाने फडणवीस नाराज 
- एप्रिल/मे २०१६ : खडसेंवर कथित स्वीय सहाय्यक लाच, दाऊदशी संभाषण, भोसरी जमीन खरेदी व्यवहार आदी गैरव्यवहाराचे आरोप 
- याच काळात अंजली दमानिया, प्रीती शर्मा यांच्याकडूनही आरोप 
- ४ जून २०१६ : खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा 
- जून २०१६ : भोसरी जमीन खरेदी प्रकरणी न्या. झोटिंग समिती स्थापन 
- जून २०१६ : खडसे सर्व चौकशांमधून बाहेर पडतील, तीन महिन्यांत पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ : फडणवीस 
- जून २०१६ पासून पुढे वारंवार झोटिंग समितीला मुदतवाढ 
- सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत खडसेंचे पुनर्वसन नाहीच 
- २०१९च्या लोकसभा निवडणुकीत स्नुषा रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरुन घोळ 
- मोठ्या संघर्षानंतर रक्षा खडसेंना लोकसभेची उमेदवारी 
- ऑक्टोबर २०१९ : विधानसभा निवडणुकीत खडसेंना उमेदवारी नाकारली 
- ऑक्टोबर २०१९ : कन्या ॲड. रोहिणी खडसेंना ऐनवेळी उमेदवारी जाहीर 
- निवडणुकीत रोहिणी खडसेंचा धक्कादायक पराभव 
- पक्षातील काहींनी पराभवासाठी प्रयत्न केले : खडसेंचा आरोप 
- डिसेंबर २०१९ : गोपीनाथगडावर मुंडेंच्या स्मृतिदिनी कार्यक्रमात पक्षनेतृत्वावर टीका 
- त्यानंतर राज्यसभा, राज्यपालपद तसेच विधानपरिषदेवर घेण्याबाबत खडसेंना आश्‍वासन 
- भाजपकडून आश्‍वासन पूर्ती नाहीच 
- जून २०२० : भाजपकडून विधानपरिषदेवर गोपीचंद पडळकरांसह अन्य उमेदवार 
- खडसेंची पुन्हा फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर तोफ 
- खडसेंच्या घरात किती पदे देणार : चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर 
- २ व १० सप्टेंबर २०२० : फडणवीसांनीच रचले षडयंत्र; पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात खडसेंचा आरोप 
- फडणवीसांचे प्रत्युत्तर : मी घरातली धुणी रस्त्यावर धूत नाही 
- २३ सप्टेंबर : शरद पवारांकडून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चाचपणी 
- ४ ऑक्टोबर : खडसेंची मुंबई वारी, शरद पवारांशी भेट झाल्याची चर्चा 
- १८ ऑक्टोबर : खडसेंच्या भाजपतील राजीनाम्याचे वृत्त; त्यांच्याकडून इन्कार 
- २० ऑक्टोबर : खडसेंचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा, राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com