आमदारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक दाखवावी... अमोल शिंदेंचे खुले आव्हान 

bjp-shiv sena.jpg
bjp-shiv sena.jpg

पाचोरा ः आमदार किशोर पाटील हे मतदारसंघातील मागण्यांबाबतचे पालकत्व व नैतिक जबाबदारी न स्वीकारता केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिलेल्या जनआक्रोश निवेदनाला वेगळीच दिशा देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. ज्या खासदारांना जेवढे मताधिक्य मिळाले, तेवढ्या मतांनी विजयी होणाऱ्या आमदारांनी आपली धमक खासदारांचे कपडे उतरवण्यासाठी नव्हे; तर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दाखवावी, असे खुले आव्हान भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोकण वाटपात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आमदारांनी पुराव्यानिशी सिद्ध केल्यास, आपण सभापतिपदाचा राजीनामा देऊ नाही तर आमदारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे सतीश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

बाजार समितीच्या सभापतींच्या दालनात अमोल शिंदे व सतीश शिंदे यांनी आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमदारांनी केलेल्या आरोपांसंदर्भात स्पष्टीकरण दिले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, शहर प्रमुख रमेश वाणी, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सी पाटील, हेमंत चव्हाण उपस्थित होते. अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले की जिल्हाधिकाऱ्यांना खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत दिलेल्या जनआक्रोश निवेदनाबाबत अथवा या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कुठलीही सहानुभूती न दाखवता, आमदार केवळ राजकारण करून शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत. शेतकऱ्यांच्या वेदनांवर राजकीय मीठ चोळण्याचा नाकर्तेपणा त्यांच्याकडून होत आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन आमच्याजवळ आहे. अनेक दिवसांपासून विविध समस्यांमध्ये होरपळलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने त्यांच्या न्यायासाठी खासदारांसोबत निवेदन दिले, त्यात गैरकाय आहे. कापूस खरेदीबाबत आमदारांचा अभ्यास कमी असावा. कारण गेल्या १० वर्षांतील २ लाख क्विंटल कापसाची उच्चांकी खरेदी खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने व सभापती सतीश शिंदे यांच्या नेतृत्वात झाली. भडगाव तालुक्यात राज्य शासनाची कापूस महासंघ संस्था असतानाही तेथे केंद्र सुरू करण्यात आमदार असमर्थ ठरले. केवळ जिनिंग मालकांची बैठक घेऊन देखावा केला. मका व ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. मात्र, तेथे दररोज फक्त पाच वाहनांमधील माल खरेदी होत आहे. असेच चालले तर पुढचा हंगाम येईपर्यंत शेतकऱ्याचा माल विक्री होणार नाही. दूधाच्या भाववाढीबाबत तसेच पीक विमा कर्जाबाबत तेथे भाजपची सत्ता आहे, असे आमदारांचे म्हणणे चुकीचे आहे. याच संस्थांमध्ये आमदारही संचालक आहेत. तरीही समस्या मांडण्यात ते असमर्थ ठरले. निदान मतदारसंघाचा प्रमुख म्हणून जनआक्रोश निवेदनातील मागण्यांसंदर्भात त्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी होती. आमदार पाटील हे खासदारांचे कपडे उतरण्याची भाषा करतात. त्यांच्यात खरोखरच पदाची व सत्तेची धमक असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या २४ तासात मार्गी लावाव्यात, असे खुले आव्हान अमोल शिंदे यांनी दिले. राजकारण करून मूळ प्रश्न व समस्यांना वेगळे वळण देण्याचा प्रयत्न आमदारांनी करू नये. त्यांच्या वेदनांवर राजकीय मीठ चोळू नये असा सल्ला अमोल शिंदे यांनी दिला.

याप्रसंगी सदाशिव पाटील, रमेश वाणी, बन्सीलाल पाटील यांनीही विविध समस्यांसंदर्भात स्पष्टीकरण देऊन आमदारांवर बोचरी टिका केली. रमेश वाणी यांनी आभार मानले.

आमदारांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावे 
कापूस खरेदी संदर्भातील टोकन प्रक्रियेत पैसे घेऊन टोकन दिल्याचा आरोप आमदारांनी पुराव्यानिशी सिद्ध केला तर आपण सभापतिपदाचा राजीनामा देऊ अथवा हे सिद्ध न केल्यास त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान सभापती सतीश शिंदे यांनी आमदार किशोर पाटलांना दिले. केवळ नको ते आरोप करून दिशाभूल करू नये. त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकाळात बाजार समितीवर कोरोडो रुपयांचे कर्ज केले गेले. शेतकऱ्यांच्या घामावर उभ्या असलेल्या या संस्थेत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला. एवढे पाप करून सुद्धा उजळ माथ्याने फिरणाऱ्या व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावे, असे आवाहन सतीश शिंदे यांनी केले.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com