esakal | जळगावच्या बाजारपेठांमध्ये सकाळी गर्दी, दुपारी शुकशुकाट

बोलून बातमी शोधा

जळगावच्या बाजारपेठांमध्ये सकाळी गर्दी, दुपारी शुकशुकाट
जळगावच्या बाजारपेठांमध्ये सकाळी गर्दी, दुपारी शुकशुकाट
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जिल्हा प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवेतील किराणा, दूध डेअरी, मिठाइची दुकाने, भाजीपाला, मांस विक्री सकाळी सात ते ११ दरम्यान निश्‍चित केली आहे. या मुळे बुधवारी (ता. २१) सकाळी या वेळेत भाजीपाला अन्‌ किराणा घेण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी झाली होती. नंतर दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता.

हेही वाचा: परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम

शासनाने ५ एप्रिलपासून संचारबंदी व कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, अत्यावश्‍यक सेवा सुरूच होत्या. त्याची वेळी सकाळी आठ ते रात्री आठ असल्याने नागरिक या ना त्या कारणाने रस्त्यावरच दिसत होते. या मुळे कडक निर्बंधाचा परिणाम दिसत नव्हता. राज्य शासनाने किराणा, दूध विक्रेत्यांना सकाळी सात ते अकरा या वेळेतच विक्रीस परवानगी दिली होती. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश काढले नव्हते. या मुळे मंगळवारी दिवसभर दुकाने बंद की सुरू ठेवावीत, या गोंधळात किराणा व्यापारी, दूध डेअरीचालक, भाजीपाला विक्रेते होते. या मुळे मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने आदेश काढून वरील वेळेतच किराणा, दूध, मांस विक्री सुरू असेल. इतर वेळेत ती बंद असेल, असे आदेश जारी केले. या मुळे बुधवारी सकाळपासूनच शहरातील दाणा बाजार, सुभाष चौक, बळिराम पेठ, जी. एस. मैदान, विविध उपनगरांतील चौकाचौकांतील किराणा दुकानांवर गर्दी झाली होती. त्याचबरोबर भाजी विक्रेते भाजी विकताना दिसून आले. तेथेही गर्दी होती. सकाळी अकरानंतर पोलिस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करीत गर्दी पांगविली. दुपारी बारानंतर सर्वत्र सामसूम दिसून आले. रस्ते निर्मनुष्य दिसून आले. केवळ पोलिस चौकाचौकांतील वाहनांना अडविताना दिसून आले. ये- जा करणाऱ्यांकडे ओळखपत्र किंवा सबळ कारण विचारत होते आणि नंतरच जाऊ देत होते. ज्यांना कारण सांगता आले नाही, अशा विनाकारण फिरणाऱ्यांना चोप देण्यात आला.

हेही वाचा: एक लिटर दुधाचा भाव..दोन पाण्याच्या बाटल्यांएवढा !

आता लॉकडाउन झाल्यासारखे वाटतेय

पूर्वी निर्बंध असूनही दिवसभर अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या. त्यासाठी नागरिकांना ये- जा करण्यास बंदी नव्हती. या मुळे नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करीत होते. या मुळे रुग्णासंख्या वाढतच होती. मात्र, बुधवारी सकाळी चार तास वगळता दिवसभर सर्वत्र रस्ते निर्मनुष्य होते. या मुळे आता खऱ्या अर्थाने लॉकडाउन झाल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या.

हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी धावतोय ‘राजकुमार’ सेवादूत !

मनपाने सहा दुकाने केले सिल

अत्यावश्य सेवांमधील दुकानांना आता सकाळी सात ते अकरा या दरम्यान दुकाने चालू करण्याची वेळ दिला आहे. परंतू अत्यावश्यक सेवा वगळता इतर सहा दुकाने आज चालु असल्याचे महापालिकेच्या पथकाला आढळले. त्यानुसार उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली सहा दुकानांना सिल करण्याची कारवाई केली.

संपादन- भूषण श्रीखंडे