एकसष्ट लाखांची हरभराडाळ पचवणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

रईस शेख
Thursday, 12 November 2020

बँकेत रक्कम पुरेशी नसल्याने दोन्ही धनादेश वठले नाहीत. तसेच उर्वरित ११ लाख ७६ हजार देणे बाकी होते. फिर्यादी संजय व्यास आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी पैशांचा तगादा लावला असता पैसे देण्यास टाळाटाळ केली होती.

जळगाव : दोन वर्षांपूर्वी हरभराडाळ व्यवसाय करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांची ६१ लाख ७६ हजारांची फसवणूक करणाऱ्या बार्शी (ता. सोलापूर) येथील अभिजित कापसे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात संशयितास हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

वाचा- केळी पीकविमाप्रश्‍नी खासदार निष्क्रिय; आमदारांवर आरोप का ?

जळगाव एमआयडीसीतील ‘व्यास’ इंडस्ट्रीज या दालमिलचे मालक संजय नंदलाल व्यास (वय ५०, रा. विवेकानंदनगर, जिल्हापेठ, जळगाव) तसेच त्यांचे मित्र राजेश ओंकार अग्रवाल यांची पुष्पा पल्सेस नावाची चनादाल कंपनी आहे. दोघांचा डाळ उद्योग असल्याने अनेक ठिकाणी सोबत व्यवसायाचा व्यवहार होतात. ६ जानेवारी २०१८ ला संशयित अभिजित अरुण कापसे (२६, रा. जोतिबाची वाडी, ता. बार्शी, जि. कोल्हापूर) यांच्याशी या दोघांचा व्यवहार झाला होता. संजय व्यास यांनी ३० लाख आठ हजार आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी ३१ लाख ६८ हजार रुपये किमतीची हरभराडाळ संशयितास दिली होती. व्यवहार झाल्यानंतर संशयित आरोपी अभिजित कापसे याने दोघांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र बँकेत रक्कम पुरेशी नसल्याने दोन्ही धनादेश वठले नाहीत. तसेच उर्वरित ११ लाख ७६ हजार देणे बाकी होते. फिर्यादी संजय व्यास आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी पैशांचा तगादा लावला असता पैसे देण्यास टाळाटाळ केली होती. यानंतर या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon police arrested a swindler in a gram dal scam