esakal | जळगाव जिल्ह्यात दहा ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात दहा ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार
जळगाव जिल्ह्यात दहा ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यावल : जिल्ह्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या प्राणवायूसाठी दहा जनरेशन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. यामुळे हवेतून ऑक्सिजन तयार करून येथील रुग्णांना तो देता येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा: स्वातंत्र्य लढ्यात रावलापाणीच्या जंगलात घडले होते भयंकर; नविन आढळल्या खुणा !

जिल्ह्यात रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, चाळीसगाव येथे जिल्हा नियोजन समिती निधीतून, तर पारोळा, अमळनेर, धरणगाव, यावल, भडगाव या ठिकाणी आपत्कालीन निधीतून जनरेशन प्लांटची उभारणी केली जात आहे. येत्या दोन दिवसांत भुसावळच्या प्लांटचा कार्यारंभ होणार असल्याचे डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. हा प्लांट कार्यान्वित झाल्यास कोरोना रुग्णांची हेळसांड थांबणार आहे. येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी भेट देऊन तालुका पातळीवरील आरोग्य प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी तहसीलदार महेश पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विजय बडे, नानासाहेब घोडके यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात फैजपूर येथे लोकसहभागातून सुरू होणाऱ्या कोविड रुग्णालयातील सोयी-सुविधांची पाहणी करण्याच्या निमित्ताने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २२) ग्रामीण रुग्णालयात धावती भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार महेश पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला उपस्थित होते.

हेही वाचा: पती-पत्नीचा गळा आवळून खून; दागिने पळवून केला दरोड्याचा बनाव

फैजपूर येथे ५० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात आले असून, यात ऑक्सिजन व्यवस्था, सिलिंडर, सुविधा, डॉक्टर, वॉर्डबॉय यांची व्यवस्था कशी आहे, याची पाहणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी गुरुवारी दौरा केला. जिल्ह्यात जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारून रुग्णांवर उपचार करण्यास प्राधान्य देत आहोत, अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी या वेळी दिली. येथील ग्रामीण रुग्णालयात लोकसहभागातून २० खाटांसाठी ऑक्सिजन पाइपलाइन तयार करण्यात आल्याचे पत्रकारांनी सांगितले असता, दुर्दैवाने कोरोना रुग्ण वाढल्यास वेळप्रसंगी येथील ग्रामीण रुग्णालयदेखील कोविड म्हणून घोषित करू, असे ते म्हणाले. येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याची घोषणा होऊन अनेक वर्षे झाली. मात्र अद्यापपर्यंत उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित झाले नसल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिले असता, यासाठी चार-पाच एकर जागा हवी आहे. ती मिळाल्यावर पुढील कार्यवाही होईल, असे आश्वासन डॉ. चव्हाण यांनी दिले.

हेही वाचा: कोरोना काळात..जळगाव शहरात दरमहा १०० ने वाढ

पगाराचा प्रश्‍न मार्गी

या वेळी डॉ. चव्हाण यांनी आस्थेवाईकपणे परिचारिकांची विचारपूस करीत पगार वेळेवर मिळतात का म्हणून विचारले. या वेळी सफाई कामगार महिलेने ऑगस्ट २०२० पासून पगार मिळाला नसल्याचे सांगताच डॉ. चव्हाण यांनी लगेच भ्रमणध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून पगाराविषयी अडचण लगेच दूर केली.

संपादन- भूषण श्रीखंडे