
Jalgaon News : शिवाजीनगर पुलाचा ‘तिढा’ सर्वानुमते सोडवा; महामार्ग विभागाचे महापालिकेला पत्र
जळगाव : शिवाजीनगर पूल ‘टी’ आकाराचा करायचा की ममुराबाद रस्त्याकडे वळवायचा, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. हा ‘तिढा’ सर्वानुमते सोडवून आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र महामार्ग विभागाने महापालिकेला दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘टी’ आकाराचे पुलाचे काम त्वरित सुरू होणार, हे दावे आता पूर्णपणे फोल ठरले आहेत.
शिवाजीनगर उड्डाणपूल सुरू झाला. त्यांचे काम अद्यापही अपूर्णच आहे. पुलाचा मूळ नकाशा आणि सध्या असलेला पूल यात मोठी तफावत आहे. आता सध्याचा पूल ‘वाय’ आकारात करण्यात आला आहे.
मूळ पूल नकाशाप्रमाणे ‘टी’ आकाराचा आहे. पुलाच्या कामास विलंब होत असल्याने तो ‘वाय’ आकारात करण्यात आला. त्याचे काम झाल्यावर ‘टी’ आकाराचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Resolve problem of Shivajinagar bridge unanimously Letter from Highway Department to Municipal Corporation Jalgaon News)
आता कामात अडथळे
‘वाय’ आकाराच्या पुलावरू वाहतूक सुरू झाली. आता ‘टी’ आकाराचे काम त्वरित सुरू होईल, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे, यासाठी निधीही उपलब्ध आहे. मक्तेदार आणि नकाशाही तयार आहे. अशा स्थितीत काम मात्र सुरू झाले नाही. ‘टी’ आकाराचा पूल उभारण्यास नागरिकांचा विरोध असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी मोर्चा काढून पूल तयार करावा, अशी मागणी केल्यावर त्या ठिकाणी पुन्हा नवीन अडचण निर्माण करण्यात आली.
ज्या ठिकाणी पूल उतरणार त्या ठिकाणी शाळा आहे. त्यामुळे त्याला रस्ता कुठे, असा प्रश्न निर्माण करण्यात आला. त्याचीही अडचण सोडविण्यात आली. शाळेला मागील भागात रस्ता असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा नवीन अडचण निर्माण करण्यात आली. पूल बांधल्यानंतर आजूबाजूला सर्व्हिस रोडला जागा असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडचण होईल, असे सांगण्यात आले.
मात्र, नकाशाप्रमाणे ही जागाही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. या सर्व अडचणीत मार्ग काढून महापालिकेने पुलाच्या रस्त्याला मार्किंग करून दिले. मात्र, आता आणखी नवीन अडचण निर्माण करण्यात आली आहे.
....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
ख्रिचन दफनभूमीकडून काढण्याचा प्रस्ताव
शिवाजीनगर पूल आता टी. टी. साळुंखे चौकाकडे न उतरविता ख्रिचन दफनभूमीकडून ममुराबाद रस्त्याला वळवावा, असा नवीन प्रस्ताव आला आहे. यासाठी रेल्वेची परवानगी, तसेच दफनभूमीकडून वळविण्यासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांधकाम विभागाचे मनपाला पत्र
पुलाचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला आता थेट पत्रच दिले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे, की शिवाजीनगर पूल ‘टी’ आकारात करायाचा की ख्रिचन स्मशानभूमीकडून वळवायचा, याबाबत आम्हाला कळविण्यात यावे. त्याबाबत आवश्यक त्या परवानगी व मंजुरी घेऊन द्यावी.
विशेष म्हणजे, हा निर्णय रहिवासी, पालकमंत्री, नगरसेवक व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते घ्यावा. त्यामुळे आम्हाला काम करणे सोयीस्कर होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे नवीन पत्र दिल्यामुळे शिवाजीनगर टी आकाराच्या पुलाबाबत आणखी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका याबाबत काय उत्तर देणार, त्यावरच आता पुढील कामाचे भवितव्य अवलंबून आहे.
भरवस्तीतील वाहतुकीचा प्रश्न
शिवाजीनगर ‘टी’ आकाराच्या प्रश्नासोबतच भरवस्तीतून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा प्रश्न सध्या गंभीर आहे. ममुराबादकडून यावलकडे, तसेच त्या भागाकडून भरवस्तीतून अवजड वाहने ये-जा करीत आहेत. महामार्ग नसतानाही शिवाजीनगरातून ही मोठी वाहने जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या आहे. ‘टी’ आकाराचा किंवा ममुराबादकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी रस्ता केल्यानंतरची ही समस्या मिटणार आहे. त्यावर कसा तोडगा काढणार, याकडेच लक्ष आहे.
शिवाजीनगरातील ‘टी’ आकाराच्या पुलाच्या बांधकामाबाबत अनेक अडचणी आहेत. त्यात रहिवाशांचा विरोध आहे, तसेच नवीन भागातून वळवायाचा असल्यास परवानगीची अडचणी आहेत. त्यामुळे पूल कशा पद्धतीने करावा, याबाबत लेखी कळविण्याचे सांगितले आहे.
-प्रशांतकुमार येळाई, कार्यकारी अभियंता, महापालिका, जळगाव