State Kabaddi Competition : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरु होणार; यंदा आयोजनाचा मान जळगाव जिल्ह्यास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Kabaddi competition

State Kabaddi Competition : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरु होणार; यंदा आयोजनाचा मान जळगाव जिल्ह्यास

जळगाव : महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व पुण्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान जळगाव जिल्ह्यास मिळाला आहे. ११ ते १५ मार्चदरम्यान सागर पार्क मैदानावर स्पर्धा होतील.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. पंकज आशिया, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित, श्‍याम कोगटा, नितीन बरडे, डॉ. प्रदीप तळवेलकर आदी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री म्हणाले, की जळगाव जिल्ह्याला कबड्डीची चांगली परंपरा आहे. जिल्ह्यातील कबड्डीपट्टूंनी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धेनिमित्त जिल्हावासीयांना आनंदाची पर्वणी मिळणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी.


३२ संघ, ३८४ कबड्डी पटूंचा सहभाग
या स्पर्धांसाठी राज्यातील विविध जिल्ह्याचे पुरुषांचे १६ व महिलांचे १६, असे एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. या संघामध्ये विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.

प्रत्येक संघातील १२ खेळाडू, १ क्रीडा मार्गदर्शक, १ व्यवस्थापक, असा एकूण १४ जणांचा समावेश राहील. स्पर्धेत ३८४ कबड्डीपट्टू, १०० सरपंच, पंच व पदाधिकारी, अधिकारी तसेच ५० स्वयंसेवक व समिती सदस्य, असे एकूण ५५० जण सहभागी होणार आहेत.

स्पर्धेसाठी सागरपार्क मैदानावर चार कबड्डीचे मैदान तयार करण्यात येणार आहेत. स्पर्धेत अंतिम विजेत्या संघाला १ लाख ५० हजार रुपयांचे, तर उपविजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.