Medical Courses Admission : ‘NCISM’, ‘CET-CELL’च्या नोटिशीची प्रतीक्षा कायम

गुजरात राज्यात बीएएमएसची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासंबंधी निर्देश दिल्यानंतर त्याच धर्तीवर अन्य राज्यांमध्येही रिक्त जागा भरून घेण्यासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना अद्याप ‘एनसीआयएसएम’ अथवा ‘सीईटी- सेल’ने एखादा राउंड घेण्याबाबत नोटीस जारी केलेली नाही.
CET Cell
CET Cellesakal

Medical Courses Admission : सर्वोच्च न्यायालयाने गुजरात राज्यात बीएएमएसची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासंबंधी निर्देश दिल्यानंतर त्याच धर्तीवर अन्य राज्यांमध्येही रिक्त जागा भरून घेण्यासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना अद्याप ‘एनसीआयएसएम’ अथवा ‘सीईटी- सेल’ने एखादा राउंड घेण्याबाबत नोटीस जारी केलेली नाही.

त्यामुळे अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. (Still waiting for NCISM CET SAIL notification jalgaon news)

दुसरीकडे, यासंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या समुपदेशकांकडूनही गेल्या आठवड्यापर्यंत एखादा राउंड नक्कीच होईल, असा दावा केला जात होता. तर ज्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत, तेसुद्धा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याबाबत ग्वाही देत होते. त्यामुळे विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत असून, एनसीआयएसएम व सीईटी- सेलने याबाबत लवकरच सकारात्मक व विद्यार्थिहिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काय आहे घोळ?

वैद्यकीय अभ्यासक्रमातील ग्रुप ‘बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस या शाखांच्या प्रवेशाची प्रक्रिया ‘एनसीआयएसएम’च्या निर्देशानुसार सीईटी- सेलने ३० नोव्हेंबर २०२३ ला संपविली. मात्र नोव्हेंबरमध्ये काही नव्या आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने त्यातील जवळपास दोनशेहून अधिक जागा रिक्त राहिल्या.

शिवाय, प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतरही राज्यात सहा नवीन आयुर्वेद महाविद्यालयांना याच शैक्षणिक वर्षासाठी मान्यता मिळून त्यांना आरोग्य विद्यापीठाचा कॉलेज कोडही प्राप्त झाला. मात्र ही महाविद्यालये प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊ शकली नाहीत. त्यामुळे या महाविद्यालयांसह रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाकडून विलंब

शेकडोंच्या संख्येने रिक्त जागा व प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थिसंख्या, त्यांचे हित लक्षात घेता न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन काहीतरी निर्णय लवकर देणे अपेक्षित असताना अद्यापही त्याबाबत कोणताही निर्णय आलेला नाही. प्रवेशप्रक्रिया संपून आता दोन महिने उलटून गेले. मात्र, विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत.

CET Cell
SSC-HSC Exam 2024 : दहावी, बारावीच्‍या परीक्षेला मिळणार अतिरिक्‍त 10 मिनिटे

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दरम्यान, गुजरात राज्यात काही विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचा प्रवेश निश्‍चित होऊ शकला नव्हता, अशा २२८ विद्यार्थ्यांच्या वतीने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यात एक सदस्यीय पीठाचा निर्णय पूर्ण पीठाने नाकारला व हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.

सर्वोच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित करण्याबाबत मान्यता देऊन राउंड घेण्याचे निर्देश दिले. त्याच धर्तीवर महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेशात प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ मिळून राउंड होतील, अशी आशा निर्माण झाली.

अद्याप नोटीस नाहीच!

‘बी’ ग्रुपमध्ये आयुर्वेद महाविद्यालयांमधील जागा मोठ्या संख्येने रिक्त आहेत. त्यामुळे किमान बीएएमएस प्रवेशासाठी एखादा स्पॉट राउंड घेण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही सीईटी- सेलकडे केली आहे.

‘सकाळ’नेही या विषयाचा पाठपुरावा केला आहे. मात्र आयुष मंत्रालयाच्या ‘एनसीआयएसएम’ची सूचना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सीईटी- सेल याबाबत नोटीस काढू शकत नाही. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांनी व्यापक विद्यार्थिहित लक्षात घेऊन तातडीने नोटीस काढून दोन-तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

CET Cell
JEE Mains Exam 2024 : जेईई मेन्‍स पेपर-2 ला 700 विद्यार्थी हजर; शनिवारपासून 2 सत्रांमध्ये पेपर-1चे आयोजन

‘नीट’ पुन्हा देणेही झाले अवघड

एकतर गेल्या वर्षी ‘नीट’ परीक्षेचा निकाल जून २०२३मध्ये लागला. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन ती तब्बल नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जवळपास पाच- सहा महिने चालली. शेवटचा स्ट्रे व्हॅकन्सी राउंड नोव्हेंबरच्या अखेरीस झाला आणि माहितीपत्रकात नमूद असतानाही सीईटी- सेलने स्पॉट राउंड घेतला नाही.

त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. शिवाय, नोव्हेंबरपर्यंत, तसेच त्यानंतरही किमान स्पॉट राउंड होऊ शकतो म्हणून आतापर्यंत विद्यार्थी वाट पाहत राहिलेत. परिणामी, या सहा- सात महिन्यांत विद्यार्थ्यांनी ‘नीट’ पुन्हा देण्याच्या दृष्टीने अभ्यासही सुरू केला नाही.

आता सर्वच प्रक्रिया संपल्यानंतर व संबंधित यंत्रणा स्पॉट राउंडसाठी नोटीस काढत नसल्याने विद्यार्थ्यांना ‘नीट’च्य अभ्यासासाठी अवघे तीनच महिने शिल्लक राहिले. अशात, त्यांचा अभ्यासही ‘कव्हर’ होणार नाही. यंत्रणांच्या आडमुठे धोरणामुळे अनेक भावी डॉक्टरांचे असे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

CET Cell
Jalgaon News : पोलिस दलातील 15 प्रभारींच्या बदल्या; बाहेरील जिल्ह्यातील अधिकारी हजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com