
जळगाव : बालिका अत्याचार प्रकरणाचा सुपरफास्ट खटला सुरू
जळगाव : चाळीसगाव शहरातील चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना २०२१ मध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी १७ व्या दिवशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले, तर दुसरीकडे अवघ्या ३८ व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता.२१) न्यायालयात सर्व साक्षीदार तपासून झाले आहेत. येत्या पंधरा दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या गुन्ह्यात इतक्या लवकर दोषारोपपत्र दाखल करणे व न्यायालयात इतक्या लवकर खटला चालवून संपविणे प्रथमच घडत आहे.
हेही वाचा: अहमदनगर : जिल्हा परिषदेत १४४ कर्मचारी बाधित
काय होते नेमके प्रकरण
चाळीसगाव येथील आनंदवाडी भागात एकाच्या घरी आलेल्या चार वर्षी चिमुरडीला बिस्कीटचा पुडा घेऊन देतो, असे सांगून निर्जनस्थळी नेत अत्याचार केल्याची घटना २८ नोव्हेंबर २०२१ ला मध्यरात्रीच्या सुमारास फिर्याद दाखल झाली होती. या प्रकरणी शुक्रवारी न्यायालयात सरकार पक्षाने १३ साक्षीदार केवळ आठ तारखांमध्ये तपासून संपूर्ण पुरावा सादर केला. चाळीसगाव शहरातील एका भागात एकाच्या घरी सावळाराम भानुदास शिंदे (२७, रा. लोंढरे, ता. नांदगाव, जि. नाशिक) हा नातेवाईक त्याच्या फारकतीचे काम असल्यामुळे आला होता. त्या वेळी आरोपीने व पीडितेच्या घरच्यांनी रात्री एकत्र जेवण केले. त्यानंतर चार वर्षाच्या पीडितेला चॉकलेट व बिस्कीट खायला घेऊन जातो, असे पीडितेच्या आईला सांगून पीडितेला रात्री नऊला घेऊन गेला. घरी आलेला नातेवाईक बराच वेळ होऊनसुद्धा येत नाही म्हणून पीडितेच्या आई व वडील यांनी घरी आलेल्या पाहुण्याच्या व पीडितेच्या शोध घेतला, पण ते मिळून आले नाही. त्यानंतर पीडितेची आई घरी असताना रात्री दहाच्या सुमारास घरी आलेला पाहुणा पीडितेला कडेवर उचलून घरी आला. तेव्हा पीडिता खूप रडत होती, म्हणून तिच्या आईने तिला विचारले असता पीडितेने सर्व सांगितले होते.
हेही वाचा: अहमदनगर : बायोडिझेल प्रकरणी शिवसेना शहर प्रमुखासह आठ जणांना जामीन
पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा
पीडितेच्या नातेवाईकांनी पाहुण्याला विचारले असता तो घाबरून घरातून पळून जाताना पहिल्या मजल्यावरून खाली पडला व बेशुद्ध झाला. त्या वेळी परिसरातील माजी नगरसेवक यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याला कळविले. पोलिसांनी पीडितेच्या घरी आलेला पाहुणा व पीडिता यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले.
या वेळी संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचे कामी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले यांनी तपास करत संशयिताला अटक केली. नंतर हा तपास डीवायएसपी कैलास गावडे यांच्याकडे दिला.
केवळ १७ दिवसांत विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
सदरचा गुन्हा अत्यंत निर्दयीपणे असल्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचे कामी केवळ १७ दिवसांत विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकर पक्षातर्फे हा खटला जिल्हा सरकारी वकील केतन ढाके पाहत असताना त्यांनी न्यायालयात सदरचा खटला लवकरात लवकर ते चालवणेस तयार असल्याचे विशेष न्यायाधीश एस. एन. गाडेकर (माने) यांना कळविले व तसा अर्ज दाखल केला. न्यायालयाने सुद्धा सदरचा खटला चालवण्याचे मान्य केले.
Web Title: Superfast Case Of Child Abuse Started
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..