गरजू दिव्यांगांसाठी सेवानिवृत्त शिक्षिकेची धडपड; साठविलेले रकमेतून भरीव मदत

गरजू दिव्यांगांसाठी सेवानिवृत्त शिक्षिकेची धडपड; साठविलेले रकमेतून भरीव मदत

सातारा ः सामाजिक बांधिलकीचे भान जपताना एका सेवानिवृत्त शिक्षिकेने आपल्या सेवानिवृत्तीच्या रकमेतून साठविलेल्या पैशाचा विनियोग गरजूंसाठी केला आहे. सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत गरजूंच्या रोजीरोटीची समस्या उभी राहिली आहे, हे समजताच त्यांनी पदरमोड करून 38 हजार रुपयांच्या रकमेतून जीवनावश्‍यक वस्तूचे वाटप केले. त्यांच्या या कामाचे विविधस्तरांतून कौतुक होत आहे.
 
प्रभा जनार्दन भोसले या सेवानिवृत्त शिक्षिका. कऱ्हाड तालुक्‍यातील भोसलेवाडी हे त्यांचे गाव. शिक्षकी पेशाच्या नोकरीतून त्या निवृत्त झाल्या आहेत. अर्थात निवृत्तीनंतरच्या काळातही त्या स्वस्थ नाहीत. समाजाशी जोडलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आजदेखील कायमच आहे. विविध सामाजिक कामांतून त्या गरीब, वंचित घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यांचे वडील हेदेखील माजी सैनिक. त्यामुळे गरिबांविषयी वाटणारी आत्मीयता, आपुलकी त्यांच्या मनात अपार भरलेली आहे. त्यांचे चिंरजीव सागर यांचे हॉटेल आहे. तिथेही सैन्य दलातील जवानांविषयी नेहमीच आदराची भावना व्यक्‍त केली जाते. त्यांच्यासाठी मोफत जेवणाची सोय उपलबध करून दिली आहे. गरजू दिव्यांगांना देखील असाच प्रत्यय येतो.
 
सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत गरीब अनेक गरजू व्यक्‍तींना, तसेच कित्येक दिव्यांगांना रोजची रोजी रोटी मिळत नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या निवृत्ती वेतनातून साठविलेल्या 38 हजार रुपयांतून 40 जीवनावश्‍यक वस्तूंची किट तयार केले. त्याचे गरजू व्यक्‍तींना, दिव्यांगांना वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्यासह सागर भोसले, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. सौ. भोसले यांनी आपल्या कुटुंबावरही तसेच संस्कार केले आहते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबच नेहमी सामाजिक कामांत अग्रेसर असते. त्यांनी केलेल्या या सामाजिक कामाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. 

आपण प्रत्येकजण समाजाचे काहीतरी देणे लागत असतो. त्यामुळे कोणत्या न कोणत्या रूपातून समाजाच्या ऋणातून उतराई होणे आवश्‍यक असते. कोरोनाजन्य परिस्थितीत समाजातील गरीब घटकांपुढे कित्येक अडचणी निर्माण झाल्या. त्यांना हातभार लागावा, म्हणूनच मदतीचा हा अल्पसा प्रयत्न. 

प्रभा भोसले, सेवानिवत्त शिक्षिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com